जळगावात कमळ फुलणार की, मशाल उजळणार? | पुढारी

जळगावात कमळ फुलणार की, मशाल उजळणार?

मिलिंद सजगुरे

जळगाव : गेल्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी नाकारल्या गेलेल्या स्मिता वाघ यांच्या पक्षनिष्ठेचा आदर ठेवत भाजपने त्यांना मैदानात उतरवून विद्यमान खासदाराला घरचा रस्ता दाखवला. त्यामुळे जळगाव मतदार संघाची चर्चा राज्यभर झाली. यंदा उमेदवारी नाकारलेले उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना पसंती देणे मतदारांच्या पचनी पडणार काय, हे पाहणे जितके रंजक ठरणार आहे, तितकेच औत्सुक्य जळगावमध्ये ठाकरे गटाने उमेदवारी दिलेल्या करण पवार यांचा किती प्रभाव पडतो, याबद्दल असणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून जळगावकरांनी भाजपला भरभक्कम साथ दिली आहे. इथे व्यक्ती गौणस्थानी, तर पक्ष प्रधानस्थानी ठरतो, ही प्रथा जणू रूढ झाली आहे. याच अनुषंगाने गेल्या निवडणुकीत ऐनवेळी स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून तो मान उन्मेष पाटील यांना देऊनही पक्षाचे मताधिक्य मुळीच घटले नाही. यंदा पाटील यांना उमेदवारी मिळणार नाही, याबाबत निवडणुकीच्या खूप आधी अटकळ बांधण्यात आली होती. त्याप्रमाणे पाटील यांना डावलून वाघ या भाजपची पसंती ठरल्या. राज्य भाजपची एकहाती मदार सांभाळणार्‍या देवेंद्र फडणवीस यांचे ‘ब्लू आईड बॉय’ असलेल्या गिरीश महाजन यांच्याशी पंगा घेतल्याने पाटलांच्या तिकिटावर संक्रांत आल्याचे बोलले जाते. श्रेष्ठींचा निर्णय अमान्य असलेल्या पाटील यांनी कमळाची साथ सोडून उद्धव ठाकरेंच्या सेनेची वाट धरली. सोबत आपले विश्वासू सहकारी करण पवार यांच्या मनगटावर ‘शिवबंधन’ बांधण्याची किमयाही पाटलांनी केलीच, शिवाय पक्षाला उमेदवार म्हणून असलेला शोधही थांबवला.

जळगावमधील निवडणुकीत स्मिता वाघ यांच्या निष्ठेचे भांडवल भाजप करणार, हे नक्की. शिवाय केंद्र आणि राज्य सरकारांच्या माध्यमातून झालेली जनहिताची कामे, अयोध्येतील रामलल्लाची पुनर्स्थापना, भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी आदी मुद्द्यांवर आधारित प्रचार मतदारांना आकृष्ट करण्यासाठी लाभदायी ठरेल, असा पक्षाचा होरा आहे. दुसरीकडे, भाजपमधील एकाधिकारशाही, शेतकरी वर्गाची अवहेलना, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर आदी मुद्दे विरोधी महाविकास आघाडी ही सत्ताधार्‍यांना जेरीस आणण्यासाठी वापरण्याची शक्यता आहे. ऐन निवडणूक काळात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भाजपमधील घरवापसी महायुती उमेदवाराला पाठबळ देऊ शकते. यंदाची निवडणूक मावळत्या खासदाराच्या भाजपविरोधी भूमिकेमुळे रंगतदार होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये पुन्हा कमळ फुलते की, मशाल पेटते, याकडे उभ्या खानदेशचे लक्ष लागून राहणार आहे.

महाजन, पाटीलद्वयींची प्रतिष्ठा पणाला

राज्य सरकारमध्ये जळगाव जिल्ह्यातील गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील हे तीन मंत्री कार्यरत आहेत. तिघांचे पक्ष वेगवेगळे आहेत. असे असले तरी महायुतीने दिलेल्या उमेदवारांच्या विजयासाठी या त्रिमूर्तीला घाम गाळणे अपरिहार्य ठरणार आहे. विशेषतः महाजन यांनी उन्मेष पाटलांचा पत्ता कापल्याचे सांगितले जात असल्याने वाघ यांच्यासाठी भाजपच्या संकटमोचकांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. ही बाब लक्षात घेता, भाजपची विजयी परंपरा अबाधित राखण्यासाठी या त्रिमूर्तींची रणनीती निर्णायक ठरेल, हे खरेच.

Back to top button