

मुंबई : पुढारी वृत्तसेवा;
शाळेत तीन ते चार तासांपर्यंतच शिकविले जावे. या काळात शाळेत कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम, संमेलन तसेच खेळाचे आयोजन करू नये. शाळेत विलगीकरणाची सुविधा असावी. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती घ्यावी. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांचे 100 टक्के लसीकरण आवश्यक तसेच शाळेच्या प्रशासनाने स्थानिक आरोग्य विभागाच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे, अशा मार्गदर्शक सूचना ( School Guidelines ) सोमवारी शालेय शिक्षण विभागाने एका परिपत्रकद्वारे जारी केल्या आहेत.
येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागापाठोपाठ शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी ( School Guidelines ) केल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.