नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : आमच्या राष्ट्रभक्तीसमोर काही राजकीय पक्ष टिकू शकत नाहीत. आगामी काळात उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय एअर कनेक्टिव्हिटीचे प्रमुख केंद्र राहणार आहे. पाच-पाच आंतरराष्ट्रीय विमानतळे असणारे उत्तर प्रदेश हे एकमेव राज्य ठरेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिल्लीला लागूनच असलेल्या जेवर (नोएडा) (Noida Airport) येथे गुरुवारी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूमिपूजनानंतर ते बोलत होते. हे आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ ठरणार आहे.
मोदी म्हणाले, इतर पक्षांचे सरकार असतानाच्या काळात नोएडा विमानतळ (Noida Airport) प्रकल्प डब्यात गेला होता. मात्र केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पाला चालना देण्यात आली. येत्या काही वर्षांत जोवर विमानतळाचे स्वप्न पूर्ण होईल. राष्ट्र प्रथम या भावनेने आमचे सरकार काम करते.
कितीही राजकारण झाले तरी देश विकासाच्या मार्गातून हटला नाही. याच महिन्याच्या सुरुवातीला नेट झिरो कार्बन इमिशन योजनेचा प्रारंभ केला. महोबा आणि झाशी येथील प्रलंबित विकासकामे हाती घेतली. उत्तर प्रदेशात एकाचवेळी 9 वैद्यकीय महाविद्यालयांची सुरुवात करत नवीन इतिहास रचला.
महाराष्ट्रात पंढरपूर येथे वारी मार्गाची सुरवात झाली. आमच्या राष्ट्रभक्तीसमोर काही राजकीय पक्षांच्या आकांक्षा टिकत नाहीत. भविष्यात उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय एअर कनेक्टिव्हिटीचे प्रमुख केंद्र होईल. पाच-पाच आंतरराष्ट्रीय विमानतळे असणारे उत्तर प्रदेश हे एकमेव राज्य ठरणार आहे. मागील सरकारांनी पश्चिम उत्तर प्रदेशच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. जेवर एअरपोर्ट हे त्याचे उदाहरण आहे.
दोन दशकांआधी भाजप सरकारने जेवर विमानतळ सुरू करण्याचा निर्धार केला होता. मात्र त्यानंतर हा प्रकल्प लाल फितीत अडकला. एका सरकारने तर विमानतळाचे काम बंद करावे, असे केंद्राला लिहून दिलेे. हा प्रकल्प राष्ट्रनीतीचा हिस्सा मानून आम्ही योजनापूर्वक काम केले. पूर्ण पारदर्शकता ठेवून जमिनीचे अधिग्रहण केले. त्यानंतरच भूमिपूजन केले.
मोदी म्हणाले, या विमानतळामुळे छोट्या शेतकर्यांना आपला शेतमाल थेट विदेशी बाजारात पाठविता येईल. असंख्य लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त झाला आहेे. कधी गरिबी, कधी गुन्हेगारी तर कधी रोजगार-उद्योगांच्या अभावामुळे उत्तर प्रदेशला टोमणे मारले जात असत. पण आता परिस्थिती बदलत असून या राज्याचे भवितव्य उज्ज्वल आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे तसेच इतर मान्यवरांचीही यावेळी भाषणे झाली.
आशिया खंडातील सर्वात मोठे तर जगातील चौथ्या क्रमांकाचे विमानतळ
उत्तर प्रदेशातील हे पाचवे विमानतळ
6,200 हेक्टर क्षेत्रफळ
पाच रन वे
4 एक्सप्रेस वेना थेट कनेक्टिव्हिटी
संपूर्ण प्रदूषणमुक्त परिसर
विमानतळाजवळ फिल्मिसिटीही बनवणार