इस्लामपुरात 11 लाखांचे कोकेन जप्त | पुढारी

इस्लामपुरात 11 लाखांचे कोकेन जप्त

सांगली : पुढारी वृत्तसेवा

इस्लामपूरजवळच्या वाघवाडी फाटा येथे एका खासगी बसमधून अकरा लाखांचे कोकेन विक्रीसाठी घेऊन जाणार्‍या विदेशी तरुणास सांगली पोलिसांच्या पथकाने पकडले. माकेटो जॉन झाकिया (वय 25, रा. जमोरिया मंगानो, टांझानिया) असे या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे 10 लाख 90 हजार रुपये किमतीचे 109 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. त्याच्यावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, झाकिया याला न्यायालयात हजर केले असता त्याला मंगळवार (दि. 30) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
ते म्हणाले, संशयित झाकिया हा बुधवारी रात्री खासगी ट्रॅव्हल्स (केए 51 एएफ 6291) बसमधून कोकेन जवळ बाळगून प्रवास करीत असल्याची माहिती तासगाव पोलिस ठाण्यातील सागर लवटे यांना खबर्‍याकडून मिळाली होती.

माकेटो हा ट्रॅव्हल्समधून मुंबईतून बंगळुरू येथे निघाला होता. तासगाव, इस्लामपूर, आष्टा, कासेगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने वाघवाडी फाटा (ता. वाळवा, जि. सांगली) येथे सापळा लावला. गुरुवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास त्याठिकाणी बस आली. त्यावेळी बसची ( के.ए.-51-ए.एफ.6291) झडती घेतली असता संशयित झाकिया मिळाला.

त्याला तत्काळ साहित्यसह ताब्यात घेतले. त्याच्या साहित्यात निळ्या रंगाची सॅक होती. त्यामध्ये 109 ग्रॅम वजनाची कोकेन या अंमली पदार्थाची पावडर सापडली. त्याची बाजारात किंमत 10 लाख 90 हजार रुपये इतकी आहे. हा अंमली पदार्थ व दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी त्याला अटक केली. उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, इस्लामपूरचे निरीक्षक शशिकांत चव्हाण, तासगावचे निरीक्षक झाडे, आष्ट निरीक्षक सिद, कासेगावचे मते, फौजदार जयपाल कांबळे, सागर लवटे, अमित परीट, संदीप गुरव आदींचा या कारवाईत सहभाग होता.

आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

गेडाम म्हणाले, झाकिया कोकेन विक्रीसाठी बंगळूरकडे निघाला होता. त्यासाठी त्याने कॅप्सूलमध्ये कोकेन ठेवले होते. ते कॅप्सूल व्हॅसलीन बॉटलमध्ये ठेवून तो तस्करी करीत होता. अशा पद्धतीने तस्करी करीत असल्याची कबुली त्याने दिली. यापूर्वी त्याच्यावर अशा प्रकारचे काही गुन्हे दाखल असण्याची शक्यता आहे. त्यानुसार तपास केला जात आहे.

झाकियाकडील पासपोर्ट मुदत संपलेला

झाकिया हा गेल्या काही दिवसांपासून मुंबईत राहतो आहे. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत पासपोर्ट मिळाला. तो तपासला असता मुदत संपलेला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. राज्यात सध्या अमली पदार्थाचे प्रकरण गाजत आहे. त्या पार्श्वभूमीवर येथे सुमारे अकरा लाख रुपयांचे कोकेन मिळाल्याने खळबळ उडाली आहे. हे आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का? याचा शोध पोलिस घेत आहेत.

Back to top button