BMC Legislative Assembly : मुंबई पालिका विधानपरिषद निवडणूक बिनविरोध | पुढारी

BMC Legislative Assembly : मुंबई पालिका विधानपरिषद निवडणूक बिनविरोध

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : BMC Legislative Assembly : मुंबई महापालिकेतील दोन जागांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी पुरस्कृत म्हणून काँग्रेसने आपला उमेदवार उतरल्यामुळे निवडणुकीला रंगत येणार होती. मात्र बुधवारी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सुरेश कोपरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे.

विधानपरिषद (BMC Legislative Assembly) निवडणुकीसाठी शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे तर भाजपने माजी आमदार राजहंस सिंह यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेस या निवडणुकीत आपला उमेदवार देणार नाही, असे सांगण्यात येत होते. पण ऐनवेळी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांच्या नावाची घोषणा केली. कोपरकर यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. त्यामुळे बिनविरोध होणारी ही निवडणूक चांगलीच रंगणार अशी चर्चा सुरू झाली.

या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत उमेदवार निवडून येईल, असा दावाही काँग्रेस नेत्यांकडून केला जात होता. एवढेच नाही तर भाजपचे नगरसेवक फोडणार असे सांगण्यात येत होते. तर दुसरीकडे भाजपनेही आपले मताधिक्‍य वाढणार असल्याचा दावा केला होता. पण अवघ्या २४ तासांतच सुरेश कोपरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेनेचे सुनील शिंदे व भाजपचे राजहंस सिंह यांची बिनविरोध निवड होणार आहे.

Back to top button