काँग्रेसच्या मंत्र्यांना मिळणार नारळ; हिवाळी अधिवेशनाआधी मंत्र्यांचे राजीनामे? | पुढारी

काँग्रेसच्या मंत्र्यांना मिळणार नारळ; हिवाळी अधिवेशनाआधी मंत्र्यांचे राजीनामे?

मुंबई, पुढारी ऑनलाईन

आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी सर्व मंत्र्यांना राजीनामे देण्यास सांगण्यात आले हाेते . त्यानंतर नव्या मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये बदल केला जाणार आहे.

नव्या चेहऱ्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आमदार प्रणिती शिंदे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. या अधिवेशनातच विधानसभेचे अध्यक्षपद निवड होईल, असेही सूत्रांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेले होते. त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. मात्र, आपण मंत्रिमंडळाची फेरबदलासाठी गेलो नव्हतो, असे पटोले म्हणाले. तरीही पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य होईल, असेही त्‍यांनी सांगितले.  काँग्रेस पक्षश्रेष्ठी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या काही मंत्र्यांना दिल्लीत बोलावून त्यांच्याशी चर्चा करत आहेत. सर्वांशी चर्चा केल्यानंतर काहीजणांना पक्षकार्यात सामावून घेतले जाईल, तर काहींना मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात येईल.

पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देताना त्यांना प्रदेशाध्यक्षपद आणि मंत्रिपद देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद निश्चित मानले जाते. त्याबरोबरच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे शिक्षण खाते कोरोना काळात अनेक निर्णयांमुळे वादात सापडले होते. कोरोना काळातील शालेय शिक्षण फी, शाळा सुरू करण्याचा निर्णय आदींबाबत पालकांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावल्याने गायकवाड यांच्याबाबत नाराजी आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबरच ऊर्जामंत्री नितीन राऊत, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्याही जबाबदाऱ्या बदलण्यात येणार असल्याचे समजते.

मंत्र्यांचे राजीनामे : विधानसभा अध्यक्षपदासाठी संग्राम थोपटेच्‍या नावाची चर्चा

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे नाव चर्चेत होते. मात्र, त्यांनी नकार कळविल्याचे समजते. त्यामुळे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविले होते. त्यांचे नाव अजूनही स्पर्धेत आहे. मात्र, पक्षाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हिवाळी अधिवेशन होणार आहेत. त्याआधी हे बदल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचलं का?

Back to top button