Ashok Chavan Resign | मोठी घडामोड! अशोक चव्हाणांसोबत १० ते ११ काँग्रेस आमदार भाजपमध्ये जाणार? | पुढारी

Ashok Chavan Resign | मोठी घडामोड! अशोक चव्हाणांसोबत १० ते ११ काँग्रेस आमदार भाजपमध्ये जाणार?

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रमुख नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला. त्याचप्रमाणे त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचाही राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला. (Ashok Chavan Resign) ”आज सोमवारी (दि. १२ फेब्रुवारी) मी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.” अशी माहिती स्वतः अशोक चव्हाण यांनी X वर पोस्ट दिली. (Ashok Chavan Resign

दरम्यान, अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरू शकतात. त्यांच्यासोबत काँग्रेसचे किती आमदार जातील याचा अंदाज खुद्द काँग्रेसला नाही. पण मागच्या राज्यसभा निवडणुकीत म्हणजे शिंदे बंडाच्या आधी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत गैरहजर राहिलेले १० ते ११ काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपात जाऊ शकतात, असे सुत्रांनी म्हटले आहे. (Ashok Chavan Resign)

‘या’ आमदारांच्या फुटण्याची चर्चा

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, प्रणिती शिंदे, जितेश अंतरपूर, झिशान सिद्दीकी, राजू आवळे, मोहन हंबरडे, कुणाल पाटील, माधवराव जवळगावकर आणि शिरीष चौधरी ही नावे चर्चेत आहेत.

दरम्यान, आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”भाजपमध्ये जाण्याचा अजून निर्णय घेतलेला नाही. काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काम केले. मला कोणाबद्दल तक्रार करायची नाही. मी काँग्रेस पक्षाचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यापुढे राजकीय भूमिका २ दिवसांत ठरवणार आहे, असे अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी काॅंग्रेसचा हात सोडल्यानंतर काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पोस्ट चर्चेत आली आहे. ”काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू.” असे पटोले यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button