Ashok Chavan Resign : अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेस नेते अमर राजूरकर यांचा राजीनामा | पुढारी

Ashok Chavan Resign : अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेस नेते अमर राजूरकर यांचा राजीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या आमदारकीच्या राजीनाम्यानंतर आणखी एक काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते व माजी आमदार अमर राजूरकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजूरकर नांदेड जिल्ह्यातील असून ते चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत.  (Ashok Chavan Resign) राजूरकर यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी प्रतोद, महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड शहर काँग्रेस कमिटीचे महानगराध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्याचप्रमाणे अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचाही राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केला आहे. (Ashok Chavan Resign)

अशोक चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आमदारकी सोडली म्हणजे पक्षही सोडला. भाजपमध्ये प्रवेशाची दाट शक्यता आहे. आमदारकी अचानक सोडण्यामागे राज्यसभेची निवडणूक आहे. अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवले जाणार असल्याचे समजते. पण त्यांची जागा चार खात्रीच्या जागांमधली आहे की महायुती लढवणारी पाचवी जागा आहे ते अजून निश्चित नाही.

खरं तर महाविकास आघाडी सरकार पडले तेव्हाच अशोक चव्हाण भाजपात जातील अशा वावड्या होत्या. कारण शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी अशोक चव्हाणांसह 11 आमदार गैरहजर होते.

दरम्यान,  अशोक चव्‍हाण भाजपमध्‍ये प्रवेश करणार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍या  उपस्‍थितीत ते गुरुवार, १५ फेब्रुवारी रोजी भाजपमध्‍ये प्रवेश करणार असल्‍याचे वृत्त ‘पुढारी न्‍यूज’ने दिले आहे. ( Ashok Chavan will join BJP on February 15 )

हेही वाचा 

Back to top button