

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून गुरुवारी १५ फेब्रुवारी रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "अशोक चव्हाण भाजपवासी झाले. विश्वास बसत नाही," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
"काल पर्यंत ते सोबत होते. चर्चा करीत होते, आज गेले. एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते," अशी राऊत यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्याचप्रमाणे अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचाही राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ते गुरुवार, १५ फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त 'पुढारी न्यूज'ने दिले आहे. आज सकाळी अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले होते. अखेर आता ते १५ फेब्रुवारी राेजी भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सूत्रांनी म्हटले आहे.
हेही वाचा :