Maharashtra Politics | राज ठाकरे करणार भाजपशी हातमिळवणी? जागावाटपाच्या चर्चेला जोर | पुढारी

Maharashtra Politics | राज ठाकरे करणार भाजपशी हातमिळवणी? जागावाटपाच्या चर्चेला जोर

पुढारी ऑनलाईन : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्ष भाजपशी हातमिळवणी करण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चाही सुरु झाली आहे. मनसे नेत्यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात यावेळी चर्चा झाल्याचे वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. (Maharashtra Politics)

राज ठाकरे यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांना जागावाटपाबाबत भाजपशी चर्चा करण्यासाठी पुढे केले आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे. पण, जागावाटपाचा प्रस्ताव अद्याप गुलदस्त्यात आहे.

मनसे नेते आणि फडणवीस यांच्यात सागर बंगल्यावर अर्धा तास चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतरही राजकीय चर्चांना उधाण आले होते. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची ही सहावी भेट होती.

महाराष्ट्रात यंदा लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आणि विधानसभेच्या २८८ जागा आहेत. सध्या सत्ताधारी महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचा समावेश आहे. (Maharashtra Politics)

हे ही वाचा :

Back to top button