‘होम पीच’वर शरद पवार, सुप्रिया सुळे यांचं भवितव्य काय ? | पुढारी

‘होम पीच’वर शरद पवार, सुप्रिया सुळे यांचं भवितव्य काय ?

बारामती : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर बारामतीत मंगळवारी (दि. 7) राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. यानिमित्त संपूर्ण पक्षच अजित पवार यांच्याकडे गेला असून, बारामतीच्या ‘होम पीच’वरील लढाई ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी अधिकच अडचणीची झाली आहे. या निर्णयानंतर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचे छायाचित्र स्टेटसला ठेवत आनंद व्यक्त केला. फटाके फोडण्यात आले. एकमेकांना मिठाई भरविण्यात आली.

2 जुलै 2023 रोजी राज्याच्या राजकारणात भूकंप करीत राष्ट्रवादीच्या 40 हून अधिक आमदारांना सोबत घेत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पवार कुटुंबातील ही दुफळी बारामतीकरांना धक्का देणारी ठरली होती. येथील सर्वच संस्थांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मजबूत पकड असल्याने त्यांच्याकडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा लोंढा वाढला. या स्थितीत शरद पवार गटाने आता कुठे पक्षबांधणीला बारामतीत सुरुवात केली असतानाच आता पक्ष आणि चिन्ह गेल्याने या गटापुढील अडचणी वाढल्या आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना आता नवीन चिन्ह घेऊन मतदारांपुढे जाण्याचे मोठे आव्हान सुप्रिया सुळे यांच्यापुढे आहे.

घड्याळ तेच; वेळ नवी
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्ष व चिन्हाबाबत अजित पवार गट सुरुवातीपासूनच कमालीचा निर्धास्त होता. ‘घड्याळ तेच… वेळ नवी’ ही टॅगलाइन प्रत्येक कार्यक्रमात फलकावर लावली जात होती. अखेर निवडणूक आयोगाचा निर्णय अजित पवार यांच्या पारड्यात पडला असून, अजित पवार यांनी घड्याळ मिळवत अचूक टायमिंग साधल्याचे बोलले जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपध्दतीवर बारामतीकरांनी नेहमीच विश्वास ठेवला आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने बारामतीला वेगळ्या उंचीवर नेले आहे. यापुढे पक्षाध्यक्ष म्हणून ते त्यात कुठेही कमी पडणार नाहीत. विकासाचा वेग आणखी
वाढणार आहे.
                             – जय पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस बारामती

शरद पवारच आमचा पक्ष
शरद पवार गटाने, ‘शरदचंद्र गोविंदराव पवार हेच आमचा पक्ष अन् तेच आमचे चिन्ह‘ असे स्टेटस ठेवत निवडणूक आयोगाच्या निर्णायावर नाराजी व्यक्त केली.

Back to top button