अभाविप संघटनेवर बंदी घाला : आंबेडकर पक्षसंघटनेची मागणी | पुढारी

अभाविप संघटनेवर बंदी घाला : आंबेडकर पक्षसंघटनेची मागणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकत्यांनी केलेला हल्ला निषेधार्ह आहे. संविधानविरोधी व आभिव्यती स्वातंत्र्यावर गदा आणणार्‍या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) या संघटनेवर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी आंबेडकर पक्ष संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.
दरम्यान, आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने उद्या गुरुवारी (दि. 8 फेब्रुवारी) दुपारी 2.00 वाजता चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन ते सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठमुख्य इमारतीपर्यंत इशारा मोर्चाचे आयोजन केले आहे.

या पत्रकार परिषदेला संघटनेच्या वतीने जीवन घोंगडे, दत्ता पोठ, संजय कांबळे, सत्यवान गायकवाड, शैलेंद्र मोरे, अक्षय कांबळे यांसह पदाधिकारी उपस्थित होते. घोंगडे म्हणाले, कोकणातील दशावतार (रामलीला) या प्रहसन प्रकारातील नाटकामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थी आपली कला सादर करीत होते. मात्र हे नाटक पूर्ण होण्याआधीच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकत्यांनी विद्यापीठीय परीक्षक आणि विद्यार्थी प्रेक्षक व इतर आणि तसेच पोलिसांच्या उपस्थितीत सदर नाटकातील विद्यार्थ्यांवर हल्ला केला आणि सदर परीक्षकांवर, विद्यापीठीय प्राध्यापकांवर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि नाटकाचा प्रयोग उधळून लावला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शैक्षणिक क्षेत्रात सांस्कृतीक दहशतवाद, झुंडशाही, संविधानविरोधी व आभिव्यती स्वातंत्र्यावर गदा आणणार्‍या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) या संघटनेवर बंदी घालावी, समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणार्‍या व चिथावणीखोर व्यक्तव्य करून अभाविप या संघटनेस बळ देणार्‍या मिलिंद एकबोटे यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करून बंदी घालावी, चतुःशृंगी पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे, विद्यार्थी आणि प्राध्यापकांवरील खोट्या केसेस मागे घ्याव्यात आदी मागण्या सरकारने त्वरित पूर्ण कराव्यात, अशी मागणी दत्ता पोळ यांनी केली.

हेही वाचा

Back to top button