डोंबिवली पुढारी वृत्तसेवा : महागणपतीच्या टिटवाळा येथे भयंकर हत्याकांड उघडकीस आल्यानंतर खळबळ माजली आहे. प्रेमाच्या आड येणाऱ्या अल्पवयीन प्रेयसीच्या आईची प्रियकराने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी समीर बबन दळवी (24) या गुरवलीत राहणाऱ्या मारेकऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांना सोनी देवराज शेरवे (39) या महिलेचा कुजलेला मृतदेह गुरवली गावाच्या हद्दीतील काळू नदीलगत असलेल्या जंगलातील झाडा-झुडपात सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी चौकस तपास करत समीर दळवी याला बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी जवळपास 10 दिवसांनी या हत्या चे गूढ उकलले आहे.
टिटवाळ्यातील इंदारनगर परिसरात सोनी शेरवे ही महिला तिच्या कुटुंबासोबत राहत होती. सोनी ही महानगरपालिकेत कंत्राटी कामगार म्हणून नोकरीला होती.
4 जुलै रोजी नेहमीप्रमाणे ती कामावर गेली. त्याचदिवशी तिने सावत्र मुलीला फोन करुन आपण गुरवली येथे काही फळे घेण्यासाठी जात आहोत. तोपर्यंत घरावर लक्ष ठेव, असे तिने सांगितले.
सोनीचा संध्याकाळी चार वाजेपर्यंत मोबाईल सुरु होता. मात्र त्यानंतर तिचा मोबाईल स्वीच ऑफ झाला. ही बाब तिच्या मुलीने आपल्या नातेवाईकांना सांगितली.
नातेवाईकांनी सोनी हिचा गुरवलीच्या जंगलात शोध घेतला. बराच वेळ शोध घेतल्यानंतरही ती सापडली नाही. अखेर कल्याण तालुका पोलिस ठाण्यात सोनी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली.
पोलीस सोनीचा शोध घेत होते. याच दरम्यान तिचा मृतदेह गुरवलीच्या जंगल शनिवारी परिसरात सापडला. सोनीच्या मृतदेहाची प्रचंड दुरावस्था झाली होती.
पोलिसांनी कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता गोवेलीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजू वंजारी यांनी तपासाकरीता काही पथके वेगवेगळ्या दिशांना पाठविली. मृत सोनीच्या संपर्कात असलेल्या सर्व नातेवाईकांची पोलिासांनी विचारपूस केली.
याच दरम्यान पोलिसांना हत्येचा सुगावा लागला. सोनीची सावत्र मुलगी आणि समीर यांच्यात प्रेमसंबंध आहेत.
याच मुद्द्यावरुन काही दिवसांपूर्वीच मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी सोनीचे समीरसोबत भांडण झाले होते. सोनी हिने समीरला तुझी लायकी नाही, तुझ्याशी माझ्या मुलीचे लग्न करणार नाही, अशा शब्दात दम भरला.
सोनीचे हेच बोल मनात सल करत होते. समीरने रागात सोनीची हत्या केली. तपास अधिकारी विजय सुर्वे यांनी तपासाची चक्रे फिरवून समीरला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान समीर याने सोनीची हत्या केल्याची कबूली दिली.
ज्यादिवशी सोनी ही गुरवलीच्या जंगलात गेली होती त्याचवेळी सोनीच्या मुलीने ही गोष्ट समीरला सांगितली होती.
समीर याने त्याचा फायदा घेतला. सोनीला जंगलात एकटे गाठले. गळा दाबून तिची हत्या केली.
कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी सोनीच्या हत्येप्रकरणी समीरला अटक केली असून त्याची अधिक चौकशी करण्यात येत आहे.