Maharashtra Politics : ठाकरे गट-काँग्रेसमध्ये तणातणी | पुढारी

Maharashtra Politics : ठाकरे गट-काँग्रेसमध्ये तणातणी

मुंबई : नरेश कदम

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने राज्यात लोकसभेच्या 23 जागांची मागणी केल्यामुळे महाविकास आघाडीत धुसफूस असतानाच मुंबई आणि विदर्भातील लोकसभेच्या काही जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांसाठी महाआघाडीच्या शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात दिल्लीत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 23 जागांची मागणी केली असली तरी काँग्रेस आणि ठाकरे गटात मुंबई आणि विदर्भातील काही जागांवरून वाद आहे.

मुंबईत ठाकरे गटाने उत्तर मुंबई वगळून दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य या पाचही जागांवर दावा केला आहे तर याच पाच जागा काँग्रेसलाही हव्या आहेत. दक्षिण मुंबईत विद्यमान खासदार अरविंद सावंत हे उद्धव ठाकरे गटाचे खासदार असले तरी माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यासाठी काँग्रेसने ही जागा मागितली आहे. दक्षिण मध्य मुंबईची जागाही शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे गटाला हवी आहे. तर ही जागा काँग्रेसच जिंकू शकते, असा काँग्रेसचा दावा आहे. उत्तर पश्चिमच्या जागेवर ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई आणि उत्तर पश्चिम या तीन जागा कोणत्याही परिस्थितीत ठाकरे गट लढविणारच आहे, असे त्यांच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

मुंबईबरोबर ठाणे जिल्ह्यातील चारही जागांवर ठाकरे गटाचा दावा आहे. यातील ठाणे आणि कल्याण या दोन जागा लढविण्याची त्यांची योजना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या किल्ल्यात ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. भिवंडीची जागा मात्र काँग्रेसला हवी आहे.

विदर्भात एकाच जागेचा शिवसेनेला प्रस्ताव

श्रविदर्भात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने रामटेक, वाशिम, बुलढाणा आणि अमरावती या चार जागा लढविल्या होत्या. त्यात अमरावतीत पराभव झाला आणि तीन जागा शिवसेनेने जिंकल्या. पण आता त्यांचे विद्यमान तिन्ही खासदार शिंदे गटासोबत गेले आहेत. बुलढाणा सोडली तर अन्य तीन जागांवर काँग्रेसने दावा केला आहे. ठाकरे गटाची ताकद घटली असून त्यांच्याकडे उमेदवारही नाहीत, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा निकष लावण्यात येऊ नये, सद्यस्थितीत काँग्रेसची ताकद विदर्भात आहे, त्यामुळे ठाकरे गटाने एक जागा लढवावी, अन्य जागांचा हट्ट सोडून द्यावा, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. 20 पेक्षा जास्त जागा मिळाल्या नाहीत, तर काँग्रेस स्वबळाचा विचार करू शकते, असा इशारा काँग्रेसने दिलेला आहे.

हेही वाचा : 

Back to top button