लोकशाहीत बहुमताला महत्त्व; अध्यक्ष मेरिटवर निकाल देतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

लोकशाहीत बहुमताला महत्त्व; अध्यक्ष मेरिटवर निकाल देतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,  पुढारी वृत्तसेवा : आमदार अपात्रता निकालाआधी विरोधक काहीही आरोप करीत असले, तरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मेरिटवर निर्णय देतील. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असून, बहुमत हे आमच्याकडे आहे, असे सांगत हा निकाल आपल्या बाजूने येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

या निकालापूर्वी मुख्यमंत्री शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्या झालेल्या भेटीवरून उद्धव ठाकरे आणि विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे. निकालापूर्वी न्यायमूर्ती जर आरोपीला भेटायला जाणार असतील, तर निकालाबाबत काय अपेक्षा करावी? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही भेट पूर्वनियोजित होती आणि आपण मतदारसंघाच्या कामाबाबत ही भेट घेतल्याचा खुलासा केला आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली.

विरोधकांकडे आरोप करण्याशिवाय दुसरा मुद्दा नाही. अध्यक्षांकडे सुनावणी झाली, त्याचा निकाल आता लागेल; पण लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडेच आहे. विधानसभा असो की लोकसभा; बहुमत आमच्याकडे आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह आम्हाला दिले आहे. त्यामुळे मेरिटप्रमाणे निकाल आपल्या बाजूने येईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

सर्व काही नियमानुसार

आम्ही कोणतेही नियम मोडलेले नाहीत. जे काही केले ते नियमाने केले आहे. सरकारही नियमाने स्थापन झाले आहे. त्यामुळे बहुमत लक्षात घेऊनच निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्षांचा निकालही मेरिटप्रमाणे लागेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Back to top button