Shiv Sena MLAs’ disqualification verdict: पात्र-अपात्र कोण? फैसला आज; विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष | पुढारी

Shiv Sena MLAs' disqualification verdict: पात्र-अपात्र कोण? फैसला आज; विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील तब्बल चार महिन्यांच्या कामकाजानंतर आज (बुधवारी) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून निकाल जाहीर केला जाणार आहे. पात्र-अपात्रतेचा निकाल जाहीर होणार असल्याने अध्यक्षांच्या निर्णयाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांचे सहकारी आमदार आणि ठाकरे गटाच्या आमदारांचे भवितव्य या निकालावर अवलंबून आहे. त्यामुळे निकालापूर्वीच मंगळवारी राज्यातील राजकीय वातावरण भलतेच तापले. दोन्ही गटांनी एकमेकांवर शरसंधान साधण्याची संधी साधली, तर नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला. त्यानुसार 14 सप्टेंबरपासून राहुल नार्वेकर यांनी याचिकांवर सुनावणी सुरू केली. 20 डिसेंबर रोजी अंतिम युक्तिवाद संपल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादेनुसार बुधवारी विधानसभा अध्यक्ष निकाल देणार आहेत.

पाचशे पानी निकाल

जवळपास 400 ते 500 पानांचा निकाल तयार करण्यात आला आहे. याचिकेतील महत्त्वाचे मुद्दे घेऊन निकालाचा सारांश विधानसभा अध्यक्ष वाचून दाखवणार आहेत. साधारणत:, 5 ते 10 पानांचा सारांश निकाल असणार आहे. तो विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात वाचून दाखविला जाण्याची शक्यता आहे. निकालाची मूळ प्रत दोन्ही गटांच्या वकिलांना पाठविली जाणार आहे. निकालाच्या द़ृष्टीने विधिमंडळाचा बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.

वकिलांना अद्याप सूचना नाही

अपात्रता याचिकेच्या निकालावरून महाराष्ट्राचे राजकारण पेटले असले, तरी इतके दिवस कायदेशीर बाजू लढविणार्‍या दोन्ही गटांच्या वकिलांना रात्री उशिरापर्यंत निकालाबाबत कोणताही निरोप दिला गेला नव्हता. मात्र, विधानभवनातून कधीही म्हणजे बुधवारी सकाळीदेखील निकालाबाबत अधिकृत ई-मेल पाठविला जाण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयावरही टिपणीची शक्यता

अपात्रता याचिकांच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्ष या संस्थेवर अतिक्रमण होत असल्याचा नवा मुद्दा चर्चेला आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही याबाबत विधान केले आहे. आजच्या निकालात अपात्रता प्रकरणात न्यायालयीन भूमिकेचाही विधानसभा अध्यक्षांकडून परामर्श घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. अशा प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या मर्यादा अधोरेखित करण्याचे धोरण असल्याचे बोलले जात आहे.

याचिकांची सहा भागांत वर्गवारी

आमदारांच्या अपात्रतेसाठी एकूण 34 याचिका विधानसभा अध्यक्षांसमोर दाखल झाल्या होत्या. या सर्व 34 याचिकांची सहा गटांत विभागणी करून सुनावणी घेण्यात आली. त्यामुळे त्यानुसार निकाल वाचून दाखविला जाण्याची शक्यता आहे. ही वर्गवारी पुढीलप्रमाणे –
1) सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेची केलेली मागणी
2) सुनील प्रभू यांनी तीन अपक्ष आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेल्या याचिका
3) सुनील प्रभू यांच्या योगेश कदम यांच्यासह शिंदे गटातील 18 आमदारांच्या अपात्रतेसाठीच्या याचिका
4) सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीच्या ‘व्हिप’चा भंग केल्याबद्दल एकनाथ शिंदेंसह 39 आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेल्या याचिका
5) सुनील प्रभू यांनी विश्वासदर्शक ठरावाबाबतच्या ‘व्हिप’चा भंग केल्याबद्दल एकनाथ शिंदेंसह 39 आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेल्या याचिका
6) भरत गोगावले यांच्या ‘व्हिप’चे उल्लंघन केल्याबद्दल ठाकरे गटाच्या 14 आमदारांच्या अपात्रतेच्या मागणीच्या याचिका

Back to top button