

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प या सरकारने गुजरातला पळविले आहेत. पुढे देखील हेच सरकार राहिल्यास मंत्रालयही गुजरातला पळवतील, असा घणाघात युवा सेनेचे प्रमुख आ. आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना केला. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या आमदार अपात्रता प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपले नाव खराब करून घेतील, असे वाटत नाही, असेही ते म्हणाले.
आ. ठाकरे मंगळवारपासून दोन दिवस कोल्हापूर दौर्यावर आले आहेत. ते म्हणाले, देशाचे संविधान धोक्यात आले आहे. त्यामुळे ते टिकणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकशाही व संविधान टिकविण्यासाठी आम्ही सर्व देशभक्त एकत्र आलो आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक मोठा प्रकल्प त्यांनी सुरत किंवा अहमदाबादला पळविला आहे. यावरून महाराष्ट्राकडे पाहण्याची त्यांची दृष्टी दिसून येते. त्यामुळे हे सरकार आणखी पुढे राहिल्यास मंत्रालय देखील गुजरातला घेऊन जातील. बुलेट ट्रेन टर्मिनल बिल्डिंग अनेक ठिकाणी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.
आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी आ. ठाकरे म्हणाले, उशिरा मिळालेला न्याय हा सुद्धा अन्यायच असतो. संविधानाच्या चौकटीत न्याय केल्यास 40 गद्दार आमदार अपात्र ठरतील. याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आपले नाव खराब करून घेतील, असे वाटत नाहीत. आमदार अपात्र प्रकरणात राहुल नार्वेकर बेअब्रू करून घेतील की महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील, हे आपणास पहावयास मिळणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीवरही ठाकरे यांनी टीका केली. या भेटीवर हल्लाबोल करताना न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला गेले, अशा शब्दांत ठाकरे यांनी या भेटीचे वर्णन केले.