मॉर्निंग वॉक करणे टाळा, मुंबईकरांना डॉक्टरांचा सल्ला | पुढारी

मॉर्निंग वॉक करणे टाळा, मुंबईकरांना डॉक्टरांचा सल्ला

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईतील उद्याने, रस्ते पहाटेच्या सुमारास गर्दीने फुलून जात असल्याचे चित्र आहे. आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील असलेली मंडळी नियमित मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडत आहेत. मुंबईचा पारा काही अंशी घसरल्यामुळे हौशी मंडळींचीही गर्दी दिसत आहे.

परंतु, मुंबईकरांनो पहाटेच्या वेळेस किंवा सकाळी लवकर घराबाहेर पडणे आणि मॉर्निंग वॉक करणे टाळा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. कारण, मुंबईतील रुग्णालयांतील ओपीडींमध्ये 60 टक्क्यांहून अधिक रुग्ण हे कान, नाक आणि घशाच्या तक्रारी घेऊन येत असल्याचे उघड झाले आहे.

मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक मोठ्या प्रमाणावर घसरला असून पहाटे किंवा सकाळी लवकर अनेक ठिकाणी समोरचे काहीच दिसत नसल्याचे चित्र आहे. कुलाबा परिसरातील हवा मोठ्या प्रमाणावर प्रदुषित झाल्याचे सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी दिसले. मंगळवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी देखील हेच चित्र होते. कुलाब्या पाठोपाठ माझगाव, बिकेसी, मालाड, अंधेरी येथील हवा मोठ्या प्रमाणावर प्रदुषित झाल्याचे दिसले.

कोरोनामुक्त झालेल्यांनी 6 ते 9 महिने काळजी घ्यावी

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी 6 ते 9 महिने आरोग्याला जपण्याची गरज आहे. अशा रुग्णांनी धावणे, जोरजोरात चालणे, अती व्यायाम करणे, जड वजने उचलणे टाळावे असेही डॉ.हाथीराम यांनी सांगितले. कोरोनामुक्त झालेली तरुण मंडळी वजन वाढल्यामुळे फीट राहण्यासाठी व्यायाम करत आहेत. परंतु, आरोग्याच्या दृष्टीने हे घातक असून अशा रुग्णांचा मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. नायर रुग्णालयातील एका तरुण डॉक्टरला प्राण गमवावे लागल्याचे डॉ.हाथीराम म्हणाल्या.

म्हणून झाली हवा खराब

मुंबईत आर्द्रता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी, वार्‍यांचा वेग कमी झाला असून हवेतील धुलीकणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत सगळीकडे धुरके दिसत आहे.

येत्या चार ते पाच दिवसांत मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे. या पावसामुळे धुरके सरण्याची आणि प्रदुषण कमी होण्याची शक्यता आहे.

या तक्रारींनी मुंबईकर हैराण

डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे, शिंका, सर्दी, खोकला अशा तक्रारी घेऊन मोठ्या संख्येने मुंबईकर रुग्णालयात येत असल्याचे नायर रुग्णालयातील कान, नाक, घसा विभागाच्या प्राध्यापक आणि विभागप्रमुख डॉ.बच्ची हाथीराम यांनी सांगितले. अनेकांचे कानाचे धडे बसल्याने कान दुखत असल्याच्या तक्रारीदेखील आहेत. तब्बल 60 टक्क्यांहून अधिक रुग्ण अशा तक्रारी घेऊन येत असल्याचे त्या म्हणाल्या.

Back to top button