Medical Store : औषध दुकानांमध्ये डिस्काऊंटचे फलक लावता येणार नाहीत; अन्न व औषध प्रशासनाचे आदेश | पुढारी

Medical Store : औषध दुकानांमध्ये डिस्काऊंटचे फलक लावता येणार नाहीत; अन्न व औषध प्रशासनाचे आदेश

कोल्हापूर; राजेंद्र जोशी : राज्यातील औषध दुकानांमध्ये दर्शनी भागावर औषधांवर 50 ते 80 टक्के आभासी डिस्काऊंट देणारे फलक लावणे हा रुग्णाला प्रलोभन दाखविण्याचा प्रकार आहे. तेव्हा असे फलक दुकानांच्या प्रवेशद्वारावरून तातडीने हटवावेत, असे आदेश राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. रुग्णांना औषधांच्या बिलावर डिस्काऊंट देणे गैर नाही. वास्तवात जेवढा डिस्काऊंट देता येऊ शकतो, त्यालाही हरकत नाही. मात्र, जे अशक्य आहे, जे दिले जात नाही, अशा डिस्काऊंटचे फलक लावून रुग्णांची दिशाभूल करणे बेकायदेशीर आहे, असेही अन्न व औषध प्रशासनाने म्हटले आहे.

संबंधित बातम्या : 

राज्यात विविध शहरांत साखळी पद्धतीने औषध दुकाने उभारलेल्या मेडिप्लस केमिस्ट अँड ड्रगिस्ट या संस्थेला प्रशासनाने दि. 20 ऑक्टोबर रोजी ही नोटीस पाठवली आहे. यात संबंधितांना दुकानांच्या दर्शनी भागावर लावण्यात आलेल्या 50 ते 80 टक्क्यांच्या मेगा डिस्काऊंटसचे फलक तातडीने हटविण्याचे आदेश देताना यासंदर्भात फलक हटविल्याविषयी अन्न व औषध प्रशासनाला अवलगत करण्याविषयीही सूचना दिल्या आहेत. याची अंमलबजावणी न झाल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा सज्जड दमही दिला आहे.

ऑनलाईन पद्धतीने औषधांची विक्री करणार्‍या काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या डिस्काऊंटचे लोण बाजारात आणले. त्यापाठोपाठ देशात अनेक ठिकाणी कार्पोरेट उद्योगही औषधी बाजारात उतरले असून, त्यांनी गावोगावी साखळी पद्धतीने दुकाने उभारून डिस्काऊंटचे लोण गावागावांत पोहोचविले आहे. औषधांच्या दुकानात दर्शनी भागावर डिस्काऊंटचे फलक लावले जातात. पण, प्रत्यक्षात औषधे खरेदी करताना हे डिस्काऊंट मिळत नाहीत, अशी तक्रार सार्वत्रिक होती. याखेरीज मोठ्या डिस्काऊंटच्या माध्यमातून विक्री होणार्‍या औषधांत काही नामवंत कंपन्यांचे बनावट ब्रँडही दाखल झाल्याची कुणकुण अन्न व औषध प्रशासनाला लागली होती.

सरसकट अंमलबजावणी नाही

या गंभीर प्रकरणाचा छडा लावण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या अंतर्गत डिस्काऊंटच्या तक्रारीवरून प्रशासनाने काही साखळी पद्धतीने औषधे विक्री करणार्‍या दुकानांची तपासणी केली असता, त्यामध्ये दुकानांच्या दर्शनी भागावर लावलेल्या फलकाप्रमाणे रुग्णांना औषधांवर डिस्काऊंट दिले जात नाही, अशी बाब पुढे आली. काही ठराविक औषधांवर हे डिस्काऊंट दिले जातात. पण, सरसकट डिस्काऊंटची अंमलबजावणी होत नाही, असे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने न दिल्या जाणार्‍या डिस्काऊंटचे फलक हे रुग्णांना प्रलोभन दाखविण्यासारखे आहे, अशी भूमिका घेतली आहे.

हेही वाचा : 

Back to top button