औषध दुकानांत होणार लसीकरण; फार्मासिस्टना मिळणार इंजेक्शन देण्याच प्रशिक्षण | पुढारी

औषध दुकानांत होणार लसीकरण; फार्मासिस्टना मिळणार इंजेक्शन देण्याच प्रशिक्षण

नागपूर; वृत्तसंस्था : देशातील साडेबारा लाख औषध विक्रेत्यांच्या जाळ्याचा वापर लसीकरणासाठी करण्याची योजना पुढे आली असून, त्यांना प्रशिक्षण देऊन कोरोनासह विविध लसीकरण कार्यक्रमांतील लसीकरण औषधी दुकानांतही होऊ शकणार आहे.

नागपुरात इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनची तीनदिवसीय परिषद झाली, त्यात या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली. देशात नोंदणीकृत औषध विक्रेत्यांची संख्या साडेबारा लाखांपेक्षा अधिक असून, त्यांनाच यापुढे व्हॅक्सिनेटर म्हणून प्रशिक्षण देऊन त्यांना लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी करून घेण्यावर तत्त्वतः ठरवण्यात आले. यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फार्मास्युटिकलच्या देखरेखीत इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन एक प्रशिक्षण कार्यक्रम आखणार आहे.

यासाठी औषध विक्रेत्यांना पंधरा दिवसांचे ऑनलाईन आणि पंधरा दिवसांचे ऑफलाईन असे महिनाभराचे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना लसीकरणाची परवानगी दिली जाणार आहे. यामुळे केवळ कोरोनाच नव्हे, तर विविध रोगांविरोधात लढण्यासाठी आवश्यक असलेले लसीकरण तसेच लहान मुले आणि गर्भवती स्त्रियांना दिली जाणारी लस व विविध राष्ट्रीय कार्यक्रमांमधील लसीकरण आगामी काळात जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये करता येईल.

Back to top button