पंजाब, जालंधर येथे अपहरणासह खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या दोन गँगस्टर्सना मुंबईतून बेड्या | पुढारी

पंजाब, जालंधर येथे अपहरणासह खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या दोन गँगस्टर्सना मुंबईतून बेड्या

मुंबई; अवधूत खराडे : पंजाब, जालंधर येथे अपहरणासह खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या दोन गँगस्टर्सना मुंबईतील कुर्ला परिसरातून गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. पंचमनूर सिंग (वय ३१) आणि हिमांशू माटा (वय ३१) अशी या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

संबंधित बातम्या : 

पंजाबमधील जालंधर पोलीस ठाण्यात सिंग आणि माटा विरोधात १३ ऑक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी त्यांच्या गँगचे वर्चस्व प्रस्थापित करून दहशत निर्माण करण्यासाठी एका व्यक्तीचे घातक हत्यारानिशी अपहरण करून खुनाचा प्रयत्न केला होता. गुन्हा दाखल होताच दोघेही पंजाबमधून पसार झाले होते. आरोपी हे मुंबईत लपून बसल्याबाबत गुन्हे शाखेच्या कक्ष पाचला माहिती मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोन्ही आरोपी गँगस्टर्सना कुर्ला येथील कामरान रेसिडेन्सी हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी जालंधर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे गुन्हे शाखेने सांगितले.

सिंग आणि माटा विरोधात जालंधर, पंजाब येथे घातक हत्यारानिशी खुनाचा प्रयत्न, दहशत माजविणे तसेच अग्निशस्त्रांची तस्करी, असे एकुण ११ गुन्हे नोंद आहेत. गुन्हे शाखेच्या कक्ष पाचचे प्रभारी पो. नि. घनश्याम नायर यांच्या नेतृत्वाखाली पो. नि. अजित गोंधळी, पो.ह. नितेश विचारे, पो.शि.गणेश काळे, पो.ह. हरेश कांबळे यांनी ही कामगिरी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button