एसटी : पुणे विभागातील २६ कर्मचारी निलंबित; विश्रांतीगृह, स्‍वच्छतागृह बंद, कर्मचाऱ्यांचे मुंडण आंदोलन | पुढारी

एसटी : पुणे विभागातील २६ कर्मचारी निलंबित; विश्रांतीगृह, स्‍वच्छतागृह बंद, कर्मचाऱ्यांचे मुंडण आंदोलन

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यासाठी गुरुवारी सकाळी एसटीच्या स्वारगेट स्थानकातील कर्मचाऱ्यांनी आपले केस कापून मुंडण आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात जोरदार निदर्शने केली.

प्रलंबित मागण्या पूर्ण न करता शासन आता संप चिरडण्याच्या मागे लागले आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी आता आपले आंदोलन तीव्र करण्याचा विचार करीत आहेत.

याचाच भाग म्हणून गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास स्वारगेट स्थानकात एसटी कर्मचाऱ्यांनी डोक्यावरील केस कापून मुंडण करत शासनाचा तीव्र निषेध केला आणि “आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्ची खाली करा,” अशी जोरदार घोषणाबाजी केली.

संपत चिरडण्यासाठी शासनाकडून आता मोठ्या हालचाली होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून शासनाने जवळपास 1 हजारच्या घरात कर्मचारी निलंबित केले आहेत.

एसटी स्थानकातून खासगी गाड्या सोडल्या आहेत. त्याचबरोबर पुणे विभागातील सुद्धा 26 कर्मचारी बुधवारी रात्री निलंबित करण्यात आले आहेत.

तसेच, स्वारगेट स्थानकातील कर्मचाऱ्यांचे विश्रांतीगृह आणि स्वच्छतागृह बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आता नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, परिणामी एसटी कर्मचाऱ्यांनी आता आपला संप तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहा व्हिडिओ : अंबाबाई मंदिर दक्षिणायन किरणोत्सव सोहळा । पहिल्या दिवशी किरणे देवीच्या कंबरेपर्यंत

Back to top button