स्वारगेट एसटी स्थानकातून आज (दि ११) सकाळी साडेबारा वाजण्याच्या सुमारास खासगी वाहतूकदारांनी आपल्या गाड्या बाहेर काढल्या. यावेळी खासगी वाहतूकदार एसटी कर्मचाऱ्यांचा संपाला पाठिंबा देत असल्याचे वाहतूकदारांकडून सांगण्यात आले.
तसेच, स्वारगेट स्थानकात खासगी ट्रॅव्हल्स चालकांना अतिरिक्त भाडे आकारता येत नव्हते. आता स्थानकाच्या बाहेर अव्वाच्या सव्वा भाडे आकारता येत असल्यामुळे खाजगी वाहतूकदारांनी आपल्या गाड्या स्वारगेट स्थानकाबाहेर काढल्या, असा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
खाजगी वाहतूकदारांनी आपल्या गाड्या स्वारगेट स्थानकाबाहेर काढल्यामुळे आता प्रवाशांचे पुन्हा हाल होत आहेत. गुरुवारी एसटी स्थानकात खासगी गाड्या मार्फत सेवा पुरवली जात असल्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, प्रवाशांच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी आणि आमच्या गाड्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आम्ही खासगी गाड्या एसटी स्थानकातून बाहेर काढत आहोत. काल (बुधवार) कोल्हापुरात आमची गाडी फोडण्यात आली. त्यामुळे आमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही हा निर्णय घेतला आहे.
– बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटना