पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना ठाकरे गटाने समाजवादी जनता परिवाराशी युती केली आहे, अशी घाेषणा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवार (दि.१६) केली. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये समाजवादी जनता परिवार आणि ठाकरे गट या दोन्ही पक्षांमध्ये संयुक्त बैठक पार पडली. समाजवादी परिवारातील विविध संघटनेतील सदस्यांनी यावेळी ठाकरे गटाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थिती दर्शवली होती. एक नवीन सुरुवात करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यानंतर भाजपाकडून ठाकरे यांच्या भुमिकेवरुन टीका केली जात आहे. (Thackeray vs Shelar) या टीकेला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Ambadas Danve)
समाजवादी विचारांच्या लोकांनी शिवसेनेची साथ दिल्याने भाजप आणि त्यांच्या हुजऱ्यांना चांगलीच मिरची झोंबलेली आहे. ज्या सत्ताधारी नेत्यांना कालच्या कार्यक्रमाची खरूज उभारली आहे, त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो, तुमच्याच केंद्रातील भाजप सरकारने आणि विश्वागुरूंनी समाजवादी विचारांचे पाईक मुलायमसिंग यादव यांना मरणोत्तर 'पद्मविभूषण' देऊन याच वर्षी गौरव केला आहे. ज्यांना समाजवादी विचारांशी आपत्ती आहे, त्यांनी आपल्या डबल ढोलकी दिल्लीश्वरांकडे याबाबत विचारणा करावी. समाजवादी विचारांची एवढीच मळमळ आहे, तर जरा स्व. जॉर्ज फर्नांडिस यांना आठवा, जे समाजवादी होतेच आणि स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारचे संरक्षणमंत्रीही होते.
ता. क. – इतिहास ज्ञान नसणारे नवखे भक्त आणि टील्ल्या पिल्ल्या पगारी पोपटांसाठी स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि जॉर्ज फर्नांडिस यांचा खास फोटो देतो आहे. मेंदूत छापून घ्यावा! असे अंबादास दानवे यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा