

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे अंतरवली सराटी (जि.जालना) येथील मनोज जरांगे-पाटील यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाजही सावध झाला आहे. ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. दरम्यान, जरांगे – पाटील यांनी अंतरवली सराटी येथे शनिवारी झालेल्या विराट सभेत राजकीय नेत्यांवर हल्लाबोल केला. (Manoj Jarange Patil)
यावर आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी 'एक्स' वर पोस्ट टाकून प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे- पाटील यांचा आदर आहे, परंतु ज्या प्रकारे त्यांना भरकटवले जात आहे, त्या भरकटवणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टात टिकणारे मराठा आरक्षण देणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याआधी त्यांचे प्रामाणिक प्रयत्न पहावेत, असेही लाड यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. (Manoj Jarange Patil)
लाड यांनी म्हटले आहे की, मराठा समाजाला १०० टक्के आरक्षण मिळायला हवंय, परंतु जरांगे- पाटील यांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. मराठा आरक्षणाच्या आडून राज्याच्या राजकारणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार यांच्यासह आजवर झालेले मराठा मुख्यमंत्री समाजाला आरक्षण का देऊ शकले नाहीत? यावर कधी बोलणार आहात? का असा सवाल लाड यांनी पोस्टमध्ये उपस्थित केला आहे.
आरक्षण हा राजकारणापेक्षा मराठा समाजाच्या हिताचा विषय आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या नेतृत्वात समाजात फूट पाडण्याचे काम करू नये, अशी विनंती लाड यांनी पोस्टमधून केली आहे.
हेही वाचा