Nanded Hospital News | नांदेडमधील मृत्युकांडप्रकरणी चौकशीअंती दोषींवर कारवाई करणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही | पुढारी

Nanded Hospital News | नांदेडमधील मृत्युकांडप्रकरणी चौकशीअंती दोषींवर कारवाई करणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  नांदेड शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूंची सरकारने गंभीर दखल घेतली असून, या घटनेची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. औषधांच्या तुटवड्यामुळे दुर्घटना घडल्याचा आरोप फेटाळून लावताना तेथे सर्व प्रकारची औषधे उपलब्ध होती; शिवाय 12 कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला होता, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (Nanded Hospital News)

नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटताच राज्य सरकार तसेच आरोग्य यंत्रणाही खडबडून जागी झाली. सरकारला विरोधकांच्या टीकेला तोंड द्यावे लागत आहे. रुग्णांच्या मृत्युकांडावर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागाकडून या घटनेचा आढावा घेतला. (Nanded Hospital News)

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने नांदेड येथे जाण्याचे निर्देश दिले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, नांदेडच्या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ मंत्री व सचिव नांदेडला गेले आहेत. संबंधित रुग्णालयात 127 प्रकारच्या औषधांचा साठा उपलब्ध होता, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. (Nanded Hospital News)

काहींना हृदयविकार, काही दुर्धर आजाराने ग्रस्त

जे रुग्ण दगावले, त्यातल्या काही जणांना हृदयविकार होता; तर काही जण दुर्धर आजाराने ग्रस्त होते. तसेच ज्या बालकांचा मृत्यू झाला ती मुदतपूर्व जन्मलेली बालके असल्याची माहिती समोर आली आहे. काही मृत्यू अपघाताने झाले आहेत; पण चौकशीनंतरच सर्व बाबी स्पष्ट होतील. झालेली दुर्घटना, झालेले मृत्यू याची चौकशी होईल. चौकशीअंती त्यावर पुढची कारवाई होईल. कुणाचा दोष असेल, तर त्याच्यावर कारवाई होईल. सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Nanded Hospital News)

हेही वाचा : 

 

Back to top button