पुढारी ऑनलाईन डेस्क : नांदेडच्या शासकीय रूग्णालयात २४ तासांत १२ नवजात बालकांसह २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यावरून राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेबाबत एक्सवर पोस्ट टाकून दु:ख व्यक्त केले आहे. त्याचबरोबर राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. (Nanded Hospital death)
नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २४ तासांत १२ नवजात बालकांसह २४ रुग्णांचा मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटनेला एक दिवस होत नाही, तितक्यातच औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात २ नवजात बालकांसह ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना शासकीय आरोग्य व्यवस्थेला काळीमा फासणारी आहे. कालची घटना ताजी असताना देखील प्रशासनाला जाग आली नाही ही, अतिशय दुर्दैवी बाब आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून सहवेदना व्यक्त करतो. मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा भावना पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, नांदेड येथील डॉ शंकरराव चव्हाण मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका दिवसात २४ मृत्यू झालेले असतानाच सोमवारी रात्रीपासून चार नवजात बालकांसह सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील दोन दिवसांत मृतांची संख्या ३१ झाली आहे. नांदेड येथे छत्रपती संभाजीनगर येथून तातडीने डॉक्टरांचे पथक पाठविण्यात आले आहे. या शिवाय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ दुपारी तीन वाजता रुग्णालयाला भेट देणार आहेत.
हेही वाचा