

नांदेड/छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मंगळवारी आणखी 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 35 झाली आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी या सरकारी रुग्णालयातही 14 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती
समोर आली आहे. या दोन्ही प्रकरणांची चौकशी तीन डॉक्टरांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत करून दोषींवर कारवाई करण्याची घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. (Nanded Hospital News)
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एकाच दिवसात 24 मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर मंत्री मुश्रीफ व गिरीश महाजन मंगळवारी दुपारी नांदेडमध्ये दाखल झाले. मुश्रीफ म्हणाले की, नांदेडमधील घटनेने शासन व प्रशासनास जाग आणली असून ही घटना घडायला नको होती. येथील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असून तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. वर्ग 3 व वर्ग 4 ची पदे ऑक्टोबरअखेर भरली जातील. पायाभूत सुविधांसह अन्य सुविधा देण्यासाठीही शासन प्रयत्न करणार आहे. औषधे व उपकरणे खरेदी करण्याचे 40 टक्के अधिकार अधिष्ठातांना देण्यात आले आहेत.
नांदेडमध्ये घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी तीन डॉक्टरांची समिती नियुक्त करण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
नांदेडच्या रुग्णालयात सोमवारी सायंकाळपर्यंत मृत्यूमुखी पडलेल्या चोवीस रुग्णांमध्ये मृत बालकांची संख्या 12 होती. त्यानंतरच्या 12 तासांत चिंताजनक रुग्णांपैकी 11 जण दगावले. त्यात 4 बालकांचा समावेश आहे. अर्धापूर येथील संगीता खैरवार यांच्या पोटी दोन जुळ्या मुलांचा जन्म झाला होता. त्यांचे वजन खूपच कमी होते. मात्र, आवश्यक उपचारांपूर्वीच दोन्ही बालके दगावली. अन्य मृतांमध्ये दोन 19 वर्षीय तरुणापासून साठी-पासष्टी ओलांडलेल्या वृद्धांचा समावेश आहे. (Nanded Hospital News)
पाचशे रुग्णांची क्षमता असताना आजघडीला 700 ते 800 रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांचा जास्त समावेश आहे. हाफकीन संस्थेने वेळेवर औषध पुरवठा केला नाही, ही बाब सत्य आहे. पण कोणत्याही औषधांचा तुटवडा नाही. औषधे बाहेरून आणायला लावली जात असतील, तर त्याचीही चौकशी केली जाईल, असे मुश्रीफ म्हणाले.