

एसटी महामंडाळाचे राज्य सरकारमध्ये तातडीने विलीनीकरण करावे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली. तातडीने याबाबत निर्णय घेऊन राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही केली. ( प्रवीण दरेकर अनिल परब भेट )
दरेकर यांनी बुधवारी परिवहन मंत्री परब यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने उपस्थित होते. दरेकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन परब यांना दिले.
या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. विविध कर्मचारी युनियन, कृती समित्या आणि काही ठिकाणी कर्मचारी आंदोलनात उतरले आहेत. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्याशी तातडीने चर्चा करून परब यांनी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत केले हे चांगले झाले. त्याबद्दल अभिनंदन केले पाहिजे. अशाच पद्धतीने पुढील पगारही झाले पाहिजेत असे दरेकर म्हणाले. परिवहन खात्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे पाठवावा, अशी मागणी केली.
परिवहन विभागाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झाले तर राज्याच्या तिजोरीवर भार पडेल हे माहीत आहे मात्र, सरकार हे काही फायदा मिळविणारी संस्था नाही, असेही दरेकर म्हणाले. सर्वसामान्य नागरिकांना आपण सेवा दिली पाहिजे, त्यासाठी परब यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपले वजन टाकले पाहिजे, असेही ते म्हणाले. विरोधी पक्ष म्हणून जे सहकार्य लागेल ते करू, असा विश्वास त्यांनी दिला. राज्य सरकारने या विषयावर विरोधकांना चर्चेसाठी बोलावले तर आम्ही निश्चितपणे सहकार्य करू, असे आश्वासनही दरेकर यांनी परब यांना दिले.
हेही वाचा :