इंदुरीकर महाराज, "मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही" - पुढारी

इंदुरीकर महाराज, "मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही"

पुढारी ऑनलाईन डेस्क : “ज्याची त्याची प्रतिकारशक्ती वेगळी आहे हे कळायला नको का? मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही”, असं वादग्रस्त विधान कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर आणि इतर क्षेत्रांतून त्‍यांच्‍यावर टीका होत आहे.

हे वादग्रस्त विधान इंदुरीकर महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील घोटी येथे एका कार्यक्रमात केले आहे. गोपाळरावजी गुळवे यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्ताने घोटी कृषी उत्पन बाजार समितीत शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५०० पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती होती.  स्थानिक महाविकास आघाडीचे नेतेदेखील या कार्यक्रमात उपस्थित होते.

इंदुरीकर म्हणाले की, “ज्याची त्याची प्रतिकार शक्ती वेगळी आहे हे कळायला नको का? प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता देखील वेगळी आहे. मी सगळीकडे फिरतो. मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन करायचे काय? कोरोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा, असे मत इंदुरीकर महाराज यांनी व्यक्त केले आहे.

मागील वर्षी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर कोरोनाकाळात इंदुरीकर महाराजांनी १ लाखाचा निधी दिला होता. इतकंच नाही तर त्यांनी लाॅकडाऊनच्या काळात संगमनेर तालुक्यातील कुटुंबाची होणारी उपासमार लक्षात घेऊन ओझर, रहिमपूर, कोकणगाव, वडगापान येथे गरीब कुटुंबाना धान्याचे वाटप केले होते.

यापूर्वीचे इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त विधान

यापूर्वीही कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराजांनी महिलांबाबत वादग्रस्त विधानं केली होती, असा आरोप करण्यात आला होता. संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत इंदुरीकर महारांज यांच्यावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. “सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते”, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं. या विधानावरही त्यांच्यावर प्रचंड टीका झालेली होती.

Back to top button