

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने हाहाकार सुरु असल्याने सरकार नावाची व्यवस्था आहे की नाही अशी संतापजनक परिस्थिती निर्माण झाली असतानाच मोदी सरकारला जरा का असेना अखेर जाग आली आहे. पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ५ आणि १० रुपये एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. उद्यापासून ही कपात लागू होणार आहे.
केंद्र सरकारकडून एक्साईज ड़्युटी कपात करण्यात आल्यानंतर केंद्रीय अर्थ मंत्रालयाने राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅट कमी करून जनतेला दिलासा देण्याचे आवाहन केले आहे.
सलग सात दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी अखेर आठव्या दिवशी इंधनाचे दर जैसे थे ठेवले. तेल कंपन्यांनी सलग सहा दिवस पेट्रोल – डिझेल दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ केली होती तर सातव्या दिवशी केवळ पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली होती.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर स्थिर असूनही ही दरवाढ करण्यात आली होती, हे विशेष. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 110.04 रुपयांवर स्थिर असून डिझेलचे दर 98.42 रुपयांवर स्थिर आहेत.
मुंबईमध्ये हेच दर क्रमशः 115.85 आणि 106.62 रुपयांवर स्थिर आहेत. तामिळनाडूतील चेन्नई आणि प. बंगालमधील कोलकाता येथे पेट्रोल क्रमशः 106.66 आणि 110.50 रुपयावर तर डिझेल 102.59 आणि 101.56 रुपयांवर स्थिर आहे. देशातील अन्य प्रमुख शहरांचा विचार केला तर हैदराबादमध्ये पेट्रोल 114.49 रुपये तर डिझेल 107.40 रुपये, बंगळुरुमध्ये पेट्रोल 113.93 तर डिझेल 104.50 रुपये, भोपाळमध्ये पेट्रोल 118.81 तर डिझेल 107.90 रुपयांवर स्थिर आहे. याशिवाय गुवाहाटीमध्ये पेट्रोल 106.09 आणि डिझेल 98.36 तर लखनौमध्ये पेट्रोल 106.96 आणि डिझेल 98.91 रुपयांवर स्थिर आहे.