दुसऱ्या फळीतील नेत्यांनी सत्तेसाठी निष्ठा विकून खाल्ली : जितेंद्र आव्हाड | पुढारी

दुसऱ्या फळीतील नेत्यांनी सत्तेसाठी निष्ठा विकून खाल्ली : जितेंद्र आव्हाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘शरद पवार यांना कधीही एकहाती सत्ता मिळाली नाही,’ अशी टीका सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली होती. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “वळसे-पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले. शरद पवार यांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे,” अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये लिहिले की, हा व्हिडिओ पाहिला आणि वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले. शरद पवार यांचा सर्वात विश्वासू साथीदार, त्यांचा लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस, प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला. शरद पवार यांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही, याच आश्चर्य वाटते. त्यांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. बाजूच्या मतदार संघात आमदार निवडून आणू न शकलेले वळसे पाटील जे काही बोलले, त्याबद्दल काही वाईट वाटत नाही. पण शरद पवार यांच्यासाठी मात्र खूप वाईट वाटले. अनेकांना सर्व काही देऊन देखील ते मात्र कायमच रीते राहिले. बरे झाले त्यांच्या विषयी यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे. महाराष्ट्र विसरणार नाही क्षमा करणार नाही, आंबेगाव धडा शिकवेल,” असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले वळसे-पाटील?

शरद पवार यांच्या उंचीचा राज्यात एकही नेता नाही असं आपण म्हणतो. परंतु राज्यातील जनतेने एकदाही शरद पवार यांना पूर्ण सत्ता दिली नाही. आपण ६०-७० आमदारच निवडून आणू शकलो. इतर राज्यांमध्ये अनेक स्थानिक पक्षांनी त्या राज्यात सत्ता मिळवली. २०१९ साली आघाडीला बहुमत मिळाले नाही. परंतु तरीही आपण सत्तेत आलो. सत्तेत आल्यानंतर कोरोनाच्या कालखंडामध्ये दोन वर्षे निघून गेली. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. आपण विरोधी पक्षात गेलो. आपल्या पक्षाच्या अनेक नवीन निवडून आलेल्या आमदारांना कोरोनामुळे निधी देता आला नाही व विरोधी पक्षात गेल्यावर निधी मिळणे कठीण झाले. म्हणून या आमदारांची भूमिका आम्ही शरद पवार यांच्याकडे मांडली. परंतु त्यांनी विरोध केला. म्हणून आपणाला हा निर्णय घ्यावा लागला. आपण भाजपप्रणीत आघाडीत गेलो आहोत. भाजपमध्ये नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अशी टीका सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी रविवारी केली.

हेही वाचा : 

Back to top button