लोकसभेच्या कामाला लागा :वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार | पुढारी

लोकसभेच्या कामाला लागा :वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  केंद्राच्या माध्यमातून राज्यात यशस्वीपणे राबविलेल्या उपक्रमअंतर्गत नागरिकांना कसा फायदा झाला, हे प्रत्यक्षात पोहचवण्याचे काम जोमाने करण्याची खरी गरज आहे. सत्तेत असलो, तरी लोकांपर्यंत म्हणजे घरोघरी कार्यकर्त्याने पोहोचणे गरजेचे असून, लोकसभा मिशन यशस्वी झाले पाहिजे. त्यासाठी कामाला लागा, असे आवाहन भाजपचे वरिष्ठ नेते आणि वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पुणे भाजप शहर पदाधिकारी बैठक बालगंधर्व रंगमंदिरात रविवारी (दि.20) पार पडली.

बैठकीत मार्गदर्शन करताना ते म्हणाले, की केंद्र सरकार सामन्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. या सर्व उपक्रमांची माहिती जनसामान्यांपर्यंत जाणे आवश्यक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने जसे जमेल तसे केलेल्या कामांची माहिती पोहोचवणे आवश्यक आहे. भाजपच्या लोकसभा संपर्क यात्रेची सुरुवात झाली असून, मिशन यशस्वी करून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर बसवणे हेच लक्ष प्रत्येक कार्यकर्त्याचे असेल पाहिजे. सर्व जबाबदारी सांभाळून भाजपने केलेल्या सर्व योजनांची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचेही काम मी करीत असतोच, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

उपक्रमांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवा
राज्यात सुरू असलेल्या कामांची पावती हीच आपल्या विजयाची खरी पावती असणार आहे. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने उपक्रमांची माहिती जनसामान्यांपर्यंत कशी पाठवता येईल, यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. केलेले चांगले काम दाखवताना अनेक वावड्या उठवल्या जातील. त्याकडे लक्ष न देता संपूर्ण ताकतीने मिशन लोकसभा यशस्वी करण्याचे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.

Back to top button