Chandrayaan-3 Mission : चांद्रयान -३ चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले आहे. आता येत्या बुधवारी (दि.२३) रोजी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ चे विक्रम लँडर मॉड्यूल चंद्रावर उतरणार आहे. दरम्यान, इस्रोने चंद्रावरील संभाव्य लँडिंग भागाची छायाचित्रे शेअर केली आहेत. ही छायाचित्रे चंद्राच्या दूरच्या भागाची असून ती लँडर हॅझार्ड डिटेक्शन अँड अवॉयडन्स कॅमेऱ्या (LHDAC) द्वारे टिपलेली आहेत. लँडर मॉड्यूलला चंद्राच्या पृष्ठभागावर दगड किंवा खोल खंदक नसलेल्या सुरक्षित ठिकाणी उतरण्यास हा कॅमेरा मदत करत आहेत, असे इस्रोने एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत म्हटले आहे.
चांद्रयान-३ आता चंद्राच्या अगदी जवळच्या कक्षेत पोहोचले आहे. विक्रम लँडर रात्री उशिरा म्हणजेच सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले. या क्षणाला लँडरपासून चंद्र केवळ २५ किमी दूर होता. नंतर त्याने ठरल्याप्रमाणे कक्षा पुन्हा रुंदावत नेली. भारतीय वेळेनुसार बुधवार, २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी लँडर चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया सुरू होईल. याबाबतची अधिकृत माहिती 'इस्रो'ने रविवारी दिली होती.
लँडर चंद्राभोवती अंडवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. याआधी ते चंद्राच्या ११३ किमी x १५७ किमीच्या कक्षेत होते. यादरम्यान एका क्षणी बंगळूर येथील इस्रोच्या मुख्यालयातून दुसरे डीबूस्टिंग ऑपरेशन (लँडरचा वेग कमी करण्याची प्रक्रिया) राबविण्यात आले. या दुसर्या डिबूस्टिंग ऑपरेशननंतर चंद्राच्या ११३ किमी x १५७ किमीच्या कक्षेतून लँडर चंद्राच्या 25 किमी x १३४ किमी या अधिक
जवळच्या कक्षेत आला. आता ज्या कक्षेत लँडर आहे, त्यात चंद्राच्या किमान अंतराचा बिंदू २५ किमीवर, तर कमाल अंतराचा बिंदू १३४ किमीवर आहे. या कक्षेत फिरत असताना एका क्षणाला लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्याची (सॉफ्ट लँडिंग) प्रक्रिया सुरू होईल. बुधवारी (२३ ऑगस्ट) लँडरने चंद्राचे चुंबन घेतलेले असेल! लँडिंगपूर्वी लँडरकडून पृष्ठभागाची तपासणी केली जाईल आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरावयाच्या नियोजित ठिकाणावर ते उतरेल. अर्थात त्यासाठी लँडरला चंद्रावरील सूर्योदयाची प्रतीक्षा तेवढी असेल.
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या प्रक्रियेत लँडरचा वेग कमी करणे ही सर्वात आव्हानात्मक गोष्ट आहे. याआधी शनिवारी (18 ऑगस्ट) डीबूस्टिंगची पहिली प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली होती.
लँडर विक्रम आता स्वयंचलित मोडमध्ये आहे. चंद्राच्या कक्षेतही तो याच अवस्थेत सध्या आहे. पुढची प्रक्रिया काय असेल, कशी असेल याचे फैसलेही तो स्वतःच करत आहे. (Chandrayaan-3 Mission)
रशियाचे लुना-२५ हे अंतराळयान मोहिमेच्या अंतिम टप्प्यात असताना तांत्रिक बिघाड झाल्याने कोसळले. यामुळे रशियाला चांद्रमोहिमेत मोठे अपयश आले. शनिवारी संध्याकाळी ५ वाजून २७ मिनिटांनी यानाशी रॉसकॉसमॉसचा (रशियन अंतराळ संशोधन संस्था) संपर्क तुटला. यानाचे कक्षांतर करताना थ्रस्टर फायर चुकले. यानात तांत्रिक बिघाड झाला.
हे यान भारताच्या चांद्रयान-३ पूर्वी २१ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील बोगुस्लाव्हस्की विवराजवळ उतरणार होते. भारतीय वेळेनुसार शनिवारी दुपारी ४.३० वाजता तशा सूचना यानाला देण्यात आल्या; मात्र कुठलाही प्रतिसाद यानाकडून प्राप्त झाला नाही. शनिवारी सायंकाळी यानात बिघाड झाल्याचे रॉसकॉसमॉसकडून सांगण्यात आले होते. नेमका काय बिघाड झाला व त्यात दुरुस्ती करता येते किंवा कसे, त्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण यश आले नाही. अखेर रविवारी यान कोसळल्याचे स्पष्ट झाले आणि रॉसकॉसमॉसने तसे जाहीर केले.
रशियाने ४७ वर्षांनंतर चंद्रावर ही नवी मोहीम आखली होती. याआधी १९७६ मध्ये रशियाची लुना-२४ ही मोहीम पार पडली होती. तेव्हा यान चंद्राच्या विषुववृत्तावर उतरले होते. चंद्रावरील १७० ग्रॅम मातीसह हे यान सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले होते. लुना-२५ चे सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाले असते तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अशी किमया करून दाखविणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला असता.
हे ही वाचा :