पवार कुटुंबियांचे जावई मोहन पाटील यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली, बिल्डरांच्या खात्यातून अजित पवार यांच्याकडे आलेले पैसे कुठे वळले गेले याची माहिती अजित पवार यांनी द्यावी, असा आरोप भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला.
ईडी आणि आयकरने केलेल्या कारवाईपासून लक्ष विचलित करण्यासाठी नवाब मलिक आरोप करत आहेत. १ हजार ५० कोटींची बेनामी संपत्ती कुठून आली. याचं अजित पवार यांनी उत्तर द्यावं असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत 1994 मध्ये विमानात कोण बसले होते, त्याला कुणी बसवले होते, हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विसरले का, असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी केला.
एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचे राज्याचे मंत्री नवाब मलिक म्हणतात. सत्तारूढ आघाडीतले त्यांच्या सुरात सूर मिसळतात. ठाकरे, पवारांना त्याचे काहीतरी वाटले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी जोरदार टीका केली. मालाड येथे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचा उल्लेख वारंवार चालवला आहे. त्याचा समाचार सोमय्या यांनी घेतला.
दिवाळीनंतर आपण राजकीय फटाके फोडणार आहोत. तीन मंत्री आणि त्यांचे जावई अशा एकूण सहा जणांच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध मंत्र्यांचे व त्यांच्याशी संबंधित लोकांच्या घोटाळ्याबाबत आरोप करत आहेत. याबाबत विविध तपास यंत्रणांकडे त्यांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. याआधी सोमय्यांनी हसन मुश्रीफ, अजित पवार, अनिल परब या मंत्र्यांसह काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.
सोमय्या म्हणाले की, दिवाळीनंतर 6 जणांचे मी फटाके फोडणार आहे. यात 3 मंत्री आणि त्यांचे जावई आहेत. काहींनी (आघाडीतील) लवंगी फटाके फोडले. मात्र, मी एकदम बॉम्ब फोडणार आहे. दिवाळी सण तोंडावर आहे. दिवाळीत लोक फटाके फोडतात. परंतु मी दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे, असे त्यांनी सांगितले. एक, दोन, तीन, चार किंवा पाच नाही; तर अर्धा डझन लोकांचे फटाके फोडणार आहे. सध्या ठाकरे सरकारमध्ये जावयांचे राज्य आहे.
हसन मुश्रीफ, नवाब मलिक आणि अजित पवारांनी आपापल्या जावयांना खूश केले आहे. या सर्वांचे दिवाळीनंतर मी लवंगी नव्हे तर एकदम बॉम्ब फोडणार आहे, असे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी राज्यात वसुली सरकार स्थापन केले आहे, अशी टीकाही सोमय्या यांनी केली.