Mumbai Rains : मुंबईला मुसळधार पावसानं झोडपलं; १२ तासात ८५.१३ मिमी पाऊस | पुढारी

Mumbai Rains : मुंबईला मुसळधार पावसानं झोडपलं; १२ तासात ८५.१३ मिमी पाऊस

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा : नवी मुंबईत गेल्या बारा तासात मुसळधार पाऊस झाला. बेलापूर विभागात सर्वाधिक ११५.२० मिमी पावसाची नोंद झाली. तर मोरबे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून धरण पातळी ८४.०६ मीटरपर्यंत वाढली. शहरात झाड कोसळणे, पाणी साचणे, शॉर्टसर्किट, आग लागण्याच्या सात घटना घडल्या आहेत. दरम्यान, उरणफाटा येथील खड्डे बांधकाम विभागाने रात्री बुजवले.

सलग पाचव्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावत नवी मुंबईला झोडपले. गेल्या तीन दिवसापासून सर्वाधिक पावसाची नोंद ही बेलापूर विभागात झाली आहे. १२ तासात नवी मुंबईत एकूण ८५.१३ मिमी पाऊस झाला. आतापर्यंत एकूण १६८७.१४ मिमी पाऊस नवी मुंबईत झाला. तर मोरबे धरण क्षेत्रात ७५ मिमी पाऊस झाला असून आतापर्यंत २४००.४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर धरणाची पातळी ८४.०६ मीटरपर्यंत पोहोचली आहे. सायन पनवेल महामार्गावर उरण फाटा उड्डाणपूलावर पडलेले खड्डे बांधकाम विभागाने रात्री बुजवले. यावेळी पोलीस उपायुक्त तिरूपती काकडे हे उपस्थित होते. त्यांनी या मार्गावर असलेले खड्डे उद्यापर्यंत पुर्ण भरण्यासाठी बांधकाम विभागाच्या अधिका-यांना सांगितले. जेणेकरून दोन दिवसांपासून होत असलेली वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. बुधवारी वाहतूक पोलीस उपायुक्त काकडे सात तास सीबीडी ते उरणफाटा या ठिकाणी स्वत: उपस्थित होते. शिवाय वाहतूक विभागातील ४५ अधिकारी आणि १७५ हून अधिक कर्मचारी महामार्गावर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कार्यरत होते, अशी माहिती डीसीपी काकडे यांनी दिली. खड्ड्यांमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : 

Back to top button