

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस म्हणताहेत की, उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, शिवसेनेने खंजीर खुपसला. पण, राष्ट्रवादीने काय खुपसले होते, ज्यामुळे तुम्ही राष्ट्रवादी फोडलीत. शिवसेना फोडून तुमचे सरकार आले होते. शिवाय अपक्षही सोबत घेऊन तुमचे सरकार मजबूत झाल्यानंतरही राष्ट्रवादी का फोडलीत, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केला.
उद्धव ठाकरे यांनी 'आवाज कुणाचा' या 'पॉडकास्ट' माध्यमातून त्यांच्या मुखपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी भाजपवर टीकेची झोड त्यांनी उठविली. 2024 हे वर्ष आपल्या देशाच्या आयुष्याला नवे वळण देईल. ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्यही शेवटी मावळलाच. प्रत्येकाचा शेवट हा होतोच. खरी शिवसेना तर 'एनडीए'त नाहीच आहे. सगळे गद्दार तिकडे गेलेले आहेत, असे ठाकरे म्हणाले.
माझ्या हिंदुत्वाची एक चौकट, जी माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी दिलेली आहे, ती चौकट मी सांगितलेली आहे. या देशावर जो प्रेम करतो, जो देशासाठी मरायला तयार आहे तो हिंदू आहे, असेही ठाकरे म्हणाले. Uddhav Thackeray
देशभक्त राजकारण्यांनी 'इंडिया' नावाची आघाडी केली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 36 पक्षांच्या 'एनडीए'ची जेवणावळ घातली. खरेतर त्यांना इतक्या पक्षांची गरज नाही. त्यांच्या एनडीएमध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत. हे तीनच पक्ष त्यांच्याकडे शिल्लक राहिलेले आहेत, सध्याचे जे चित्र आहे त्या पद्धतीने मी सत्ता राबवू इच्छित नाही आणि माझ्याकडून ती तशी राबवलीही जाणार नाही. जर मला सत्ता टिकवायची असती तर जे गद्दार होते ते गद्दारी करण्यापूर्वी माझ्यासोबतच दोन-तीन दिवस होते. त्यांना हॉटेलमध्ये किंवा इतरत्र डांबून ठेवू शकलो असतो. पण, असे किती दिवस डांबून ठेवणार. जी मनानेच विकली गेली आहेत ती माणसे मला नकोच आहेत, असे ठाकरे म्हणाले.
कुटनीतीला कुटण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही. कारण 2019 साली युतीत निवडणूक लढून तुम्ही महागद्दारी केली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केले, तेव्हाच तुम्ही नीतीमत्ता पायाखाली तुडवली होती, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. घराणेशाही टिकवण्यासाठी एकत्र आलेल्या 'ईस्ट इंडिया' कंपनीचे कडबोळे आता लोकशाही टिकवण्याच्या गप्पा मारत आहेत. मी, माझं कुटुंब आणि माझा मुलगा एवढाच विचार करणार्या उद्धव ठाकरेंच्या तोंडून लोकशाही वाचवण्याच्या गप्पा ऐकणं म्हणजे मोठा विनोदच आहे, असे बावनकुळे ट्विटमध्ये म्हणाले.
हे ही वाचा :