…तर मंत्रालयात घुसावे लागेल ; माजी आमदार महादेव बाबर यांचा इशारा | पुढारी

...तर मंत्रालयात घुसावे लागेल ; माजी आमदार महादेव बाबर यांचा इशारा

कोंढवा : पुढारी वृत्तसेवा :  कात्रज-कोंढवा मार्गावर आतापर्यंत 60 ते 70 नागरिकांचे नाहक बळी गेले असून, अनेक जण अपंग होऊन घरी बसले आहेत. रस्त्यातील बाधितांना आणि या रस्त्याच्या कामासाठीचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला नाही, तर मंत्रालयात घुसून नागरिकांच्या भावना काय आहेत, ते राज्य शासनाला दाखवून देऊ, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी दिला. बाबर यांच्या नेतृत्वाखाली कात्रज-कोंढवा मार्गावर गोकुळनगर चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन करीत खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

त्या वेळी ते बोलत होतो. या वेळी राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. या वेळी जिल्हाप्रमुख विजय देशमुख, उपशहर प्रमुख समीर तुपे, विभागप्रमुख राजेंद्र बाबर, माजी नगरसेवक तानाजी लोणकर, भरत चौधरी, संगीता ठोसर, गणेश कामठे, गंगाधर बधे, प्रसाद बाबर यांच्यासह पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाबर म्हणाले, की कात्रज बाह्यवळण मार्गासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 200 कोटी रुपयांचा निधी देऊ, असे सांगितले. मात्र, अद्याप हा निधी उपलब्ध न झाल्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्याच्या कामासाठी 200 कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करून काम मार्गी लावले नाही, तर या रस्त्यावरून आमदार, मंत्र्यांना फिरू देणार नाही. या रस्त्यावर बळी गेले त्याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. शिवसेनेचे घनश्याम हाके म्हणाले, की या रस्त्यावरील अपघातात बळी गेले त्याला मिंधे गट, भाजप सरकार आणि मनपा प्रशासन जबाबदार आहेत. महापालिका आणि राज्यातील भाजपचे सरकार रस्त्याची कामे जाणूनबुजून करीत नाही.

हेही वाचा :

Back to top button