पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या पाच दिवसांपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यंदाचे पावसाळी अधिवेशन वेगवेगळ्या विषयावर चांगलेच गाजत आहे. आज विधानसभेत विरोधी पक्षाने मणिपूर महिलांना विवस्त्र करत धिंड प्रकरणी सभा अध्यक्षांनी सभागृहात चर्चा करु दिली नाही म्हणून विरोधीपक्षातील नेत्यांनी सभात्याग केला. (Monsoon Session)
ईशान्य भारतातील मणिपूर गेल्या ८३ दिवसांपासून धुमसत आहे. राज्यातील हिंसाचाराच्या काही चित्रफिती आता समोर आल्या आहेत. समाज माध्यमावर व्हायरल होत असलेल्या या चित्रफितीत जमावाकडून दोन महिलांना विवस्त्र करीत रस्त्यावर फिरवले जात असल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील याप्रकरणाची स्वत:हून दखल घेतली आहे. सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी केंद्र आणि राज्य सरकारला कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. सरकारने कारवाई केली नाही, तर न्यायालय स्वत: याप्रकरणात हस्तक्षेप करेल, असे देखील सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले आहे.
आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस. सभागृहात मणिपूर अत्याचार प्रकरणी चर्चा करु दिली नाही म्हणून विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेत सभात्याग केला. वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे आदी महिला आमदार आक्रमक झाले. यशोमती ठाकुर यांनी ट्विट करत म्हंटले आहे की," मणिपूर मध्ये मानवतेला काळीमा फासणाऱ्या महिला अत्याचाराच्या अत्यंत घृणास्पद घटनेच्या विरोधातील आणि बघ्याची भूमिका घेणाऱ्या निष्क्रिय केंद्र सरकारच्या निषेधाचा ठराव सभागृहात मांडला जावा आणि त्यावर चर्चा घडवून आणली जावी म्हणून काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे चर्चेची मागणी केली. यावरून सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, मात्र अध्यक्षांनी चर्चा नाकारल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला."
हेही वाचा