Irshalwadi Landslide Incident : इर्शाळवाडीवर दुःखाचा कडा; 16 मृत्युमुखी; शंभरावर गाडले गेल्याची भीती | पुढारी

Irshalwadi Landslide Incident : इर्शाळवाडीवर दुःखाचा कडा; 16 मृत्युमुखी; शंभरावर गाडले गेल्याची भीती

खोपोली (रायगड); प्रशांत गोपाळे : रायगड जिल्ह्यावर निसर्ग कोपला आहे. गेल्या चार दिवसांपासून कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री 11 च्या सुमारास खालापूर तालुक्यातील इर्शाळगडाखालील कडा तुटून इर्शाळवाडीवर कोसळला अन् 28 कुटुंबांची ही वाडी भुईसपाट झाली. कडा कोसळल्याने साखरझोपेत असलेल्या 16 जणांचा ढिगार्‍याखाली करुण अंत झाला. तर सुमारे शंभरावर लोक ढिगार्‍यात गाडले गेले. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. 228 रहिवाशांपैकी 103 लोकांनी कसाबसा आपला जीव वाचवत दुसर्‍या वाड्यांचा आश्रय घेतला. घरातील कर्ते पुरुष आणि महिलांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. दुर्घटनेची माहिती कळताच राज्य शासनाने तत्काळ मदत आणि बचावकार्य सुरू केले. ( Irshalwadi Landslide Incident)

103 जण बचावले; 48 घरे ढिगार्‍याखाली

गुरुवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत स्थानिक तरुण, ट्रेकर्स, अग्निशमन पथक आणि एनडीआरएफ पथकाने 103 जणांना मदतकार्य पोहोचवले. अद्यापही शंभरावर लोक ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी गुरुवारी घटनास्थळी धाव घेतली. मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्या वतीने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींवरील उपचारांचा सर्व खर्च राज्य सरकार करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

इर्शाळगडाच्या पायथ्याशी तीन किलोमीटरवर ही वाडी आहे. ती चौक गावातील मुख्य रस्त्यापासून सहा किलोमीटर उंच डोंगरात आहे. येथे जाण्यासाठी रस्ता नाही. केवळ डोंगरातील पायवाट आहे. मोरबे धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या या आदिवासी वाडीमध्ये 48 घरे आणि 250 ते 300 लोकवस्ती आहे. बुधवारी रात्री 11.30 च्या सुमारास ही वाडी गाढ झोपेत होती. त्याच सुमारास इर्शाळगडाखालील पर्वताचा महाकाय कडा तुटून वस्तीवर कोसळला. सर्व ग्रामस्थ गाढ झोपेत होते. घरातील माणसांना बाहेर येण्याची अथवा मदतीसाठी हाक देण्याची संधीच मिळाली नाही. मुसळधार पाऊस आणि वारा, त्यातच दुर्गम भाग असल्यामुळे रात्रीची मदत मिळू शकली नाही.
खालापुरात गेले चार दिवस तुफान पाऊस सुरू आहे. तीन दिवसांत जवळपास 541 मि.मी. इतक्या पर्जन्यवृष्टीमुळे इर्शाळगडाच्या माथ्यावरचा कडा कमकुवत झाला आणि त्याचा काही भाग वाडीवर कोसळला. गडाचा कडा कोसळल्याच्या आवाजाने येथील काही जणच घराबाहेर पळत येऊ शकले. झोपेत असलेली अनेक कुटुंबे काही कळायच्या आत माती आणि दरडीच्या अवाढव्य
ढिगार्‍याखाली गाडली गेली. ( Irshalwadi Landslide Incident)

मदतकार्यात अनंत अडचणी

या दुर्घटनेची माहिती इर्शाळवाडीतील मंदिरात बसलेल्या काही तरुणांनी चौक गावात दिली. त्यांनी प्रशासनाला तातडीने कळवले. खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी सर्व यंत्रणांना सूचना देत घटनास्थळी धाव घेतली. तातडीने बचावकार्य आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. मात्र, धुवाँधार पाऊस आणि आसमंत अंधारलेला असल्याने मदतकार्यात असंख्य अडचणी येत होत्या. तहसीलदार तांबोळी, पोलिस कर्मचारी, स्थानिक तरुण, सामाजिक संस्था अंधारात गड चढून मदतीसाठी पोहोचले. आमदार महेश बालदी, मंत्री गिरीश महाजन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दोघांनी अंधारात गड चढून परिस्थितीचा आढावा घेतला.

मदतकार्याला पहाटे चार वाजले

दुर्घटनेची माहिती रात्री एक वाजता आपत्कालीन मदत विभागाला कळविण्यात आली. मात्र, मदतकार्य पोहोचायला पहाटेचे चार वाजले. त्यातच सोसाट्याचा वारा आणि तुफान पावसामुळे मदतकार्यात मोठे अडथळे निर्माण होत होते. डोंगरावरून चिखलाचे लोटच्या लोट खाली येत असल्यामुळे मदत आणि बचावकार्यात प्रचंड अडचणी येत होत्या.

पहाटेपासून रेस्क्यू ऑपरेशन

रात्रीचा तुफानी पाऊस, अंधार आणि परिसरातील प्रचंड धुके, यामुळे एनडीआरएफ टीम पोहोचण्यास विलंब लागला. प्रत्यक्षात पहाटेपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. अशाही परिस्थितीत मदत आणि बचाव पथकाने अव्याहतपणे काम सुरू ठेवले. सायंकाळी साडेपाचपर्यंत 103 जणांना वाचवण्यात यश आले आहे. 23 जखमींवर उपचार सुरू आहेत. मात्र, 16 जण मृत्युमुखी पडले आहेत. अद्याप शंभरावर नागरिक ढिगार्‍याखाली बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी बचावकार्य थांबवण्यात आले.

मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री घटनास्थळी

सकाळी वृत्तवाहिन्यांवर या दुर्घटनेचे वृत्त झळकू लागले. मन सुन्न करणार्‍या या घटनेने राज्यातील जनतेचे काळीज हेलावून गेले. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह पालकमंत्री उदय सामंत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नामदार आदिती तटकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे सकाळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या दुर्घटनेतून वाचलेल्या कुटुंबांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतकार्य वेगाने होण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा काम करत असल्याचे सांगितले.

नातेवाईकांचे टाहो अन् धीरगंभीर वातावरण

गुरुवारी बचावकार्य सुरू झाले असले, तरी इर्शाळवाडीवर दु:खाची दाट छाया पसरली आहे. नातेवाईक गमावलेल्या ग्रामस्थांचा टाहो आणि मृतदेहांमुळे तेथील वातावरण धीरगंभीर आहे. डोंगरकडा कोसळला तेव्हा प्रौढ घराबाहेर पळत आले. मात्र, लहान मुले ढिगार्‍याखाली सापडली. त्यामुळे ती नजरेला कधी आणि कशा अवस्थेत पडतील, अशी काळजीची गडद छाया घेऊन लोक उपसणार्‍या ढिगार्‍याकडे एकटक नजर लावून असल्याचे विदारक चित्र गुरुवारी दिवसभर दिसत होते. सध्या येथे 15 डॉक्टर आणि 25 रुग्णवाहिकांच्या माध्यमातून वैद्यकीय मदत देण्यात येत आहे. ( Irshalwadi Landslide Incident)

लोकांना वाचवण्यासाठी आमचे प्रयत्न : मुख्यमंत्री

दुपारी 2.16 वाजता घटनास्थळावर पोहोचलेल्या मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची पाहणी केली. मदतकार्याला वेग कसा देता येईल, याबाबत प्रशासनाशी चर्चा केली. यानंतर विरोधकांनी शासनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असल्याची टीका केली आहे. यावर तुमचे मत काय? यावर बोलताना, मुख्यमंत्र्यांनी टीकेवर बोलण्याची ही वेळ नाही. लोकांना वाचवण्याची ही वेळ आहे. आम्ही बचावकार्य गतिमान करत आहोत, असे स्पष्टीकरण दिले. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील, अशी त्यांनी घोषणा केली. किती लोक अडकले आहेत, हे सांगणे कठीण असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

जेसीबी एअरलिफ्टचा प्रयत्न : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

घटनास्थळावर जेसीबीसारखी यंत्रणा पोहोचवता येत नाही म्हणून एअरलिफ्टने जेसीबी नेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. घटना अत्यंत दुर्दैवी असून, अशा घटना घडू नयेत म्हणून काळजी घेतली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

निसर्गाने पाच वर्षांपूर्वी दिला होता इशारा

2019 मध्ये इर्शाळगडावर मोठ्या प्रमाणात दगड आणि मातीचा ढिगारा कोसळला होता. सुदैवाने त्यावेळी जीवितहानी झाली नव्हती. परंतु, मुख्य सुळक्यावर जाण्याची वाट बंद झाली होती. इर्शाळवाडीतील कुटुंबे सध्या लावणीच्या कामावर मजुरीसाठी बाहेर जातात. रमेश भोर, त्यांची पत्नी पदी भोर आणि दोन लहान मुले चिंचवली येथे भात लावणीच्या कामासाठी गेल्यामुळे त्यांचा जीव बचावला. परंतु, रमेश भोर यांची आई एकटीच घरी होती. तिचे काय झाले? याची रमेश भोर यांना काही माहिती मिळाली नव्हती.

सामूहिक अंत्यसंस्कार

पथकाने बाहेर काढलेल्या मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. एका बाजूला बचावकार्य, दुसरीकडे अंत्यसंस्काराची तयारी आणि नातेवाईकांचा आक्रोश, असे वातावरण होते.

लोकांना वाचवण्यासाठी आमचे प्रयत्न : मुख्यमंत्री

दुपारी 2.16 वाजता घटनास्थळावर पोहोचलेल्या मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची पाहणी केली. मदतकार्याला वेग कसा देता येईल, याबाबत प्रशासनाशी चर्चा केली. यानंतर विरोधकांनी शासनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असल्याची टीका केली आहे. यावर तुमचे मत काय? यावर बोलताना, मुख्यमंत्र्यांनी टीकेवर बोलण्याची ही वेळ नाही. लोकांना वाचवण्याची ही वेळ आहे. आम्ही बचावकार्य गतिमान करत आहोत, असे स्पष्टीकरण दिले. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील, अशी त्यांनी घोषणा केली. किती लोक अडकले आहेत, हे सांगणे कठीण असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

जेसीबी एअरलिफ्टचा प्रयत्न : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

घटनास्थळावर जेसीबीसारखी यंत्रणा पोहोचवता येत नाही म्हणून एअरलिफ्टने जेसीबी नेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. घटना अत्यंत दुर्दैवी असून, अशा घटना घडू नयेत म्हणून काळजी घेतली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Back to top button