Manipur violence : मणिपूर महिला अत्याचार प्रकरणी संजय राऊतांची सरकारवर कठोर टीका म्हणाले, मगरीचे अश्रू… | पुढारी

Manipur violence : मणिपूर महिला अत्याचार प्रकरणी संजय राऊतांची सरकारवर कठोर टीका म्हणाले, मगरीचे अश्रू...

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मणिपूर हिंसाचाराची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे, हा गंभीर मुद्दा आहे, पण आपल्या संसदेत यावर चर्चा होत नाही, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. पुढे त्यांनी प्रश्न केला आहे की, “मणिपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल का बोलत नाही? तसेच ‘ते’ आता मगरीचे अश्रू ढाळत आहे, अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे. (Manipur violence)

ईशान्य भारतातील मणिपूर गेल्या ८३ दिवसांपासून धुमसत आहे. राज्यातील हिंसाचाराच्या काही चित्रफिती आता समोर आल्या आहेत. समाज माध्यमावर व्हायरल होत असलेल्या या चित्रफितीत जमावाकडून दोन महिलांना विवस्त्र करीत रस्त्यावर फिरवले जात असल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील याप्रकरणाची स्वत:हून दखल घेतली आहे. सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी केंद्र आणि राज्य सरकारला कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. सरकारने कारवाई केली नाही, तर न्यायालय स्वत: याप्रकरणात हस्तक्षेप करेल, असे देखील सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले आहे.

Manipur violence : कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल का बोलत नाही? 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना सरकारला मणिपूर घटनेप्रकरणी धारेवर धरले आहे. त्यांनी म्हंटलं आहे की, “मणिपूर हिंसाचाराची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे, हा गंभीर मुद्दा आहे, पण आपल्या संसदेत चर्चा होत नाही.  तुम्ही मणिपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल का बोलत नाही?” असाही सवाल त्यांनी केला आहे. पुढे बोलत असताना ते म्हणाले आहेत की, निर्भया प्रकरणात भाजपने तत्कालीन सरकारला हादरवले होते. ते त्यावेळी विरोधी पक्षात होते पण, आता दोन महिलांना विवस्त्र करुन धिंड काढण्यात आली. तरीही सरकार गप्प आहे. या घटनेनंतर ते आता मगरीचे अश्रू ढाळत आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली.

हेही वाचा 

Back to top button