waterfall : मलाड येथे धबधब्याच्या प्रवाहात युवक गेला वाहून | पुढारी

waterfall : मलाड येथे धबधब्याच्या प्रवाहात युवक गेला वाहून

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : बुधवारी सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई दिंडोशी मलाड येथे क्रांती नगर येथील डोंगरावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्यात युवक वाहून गेल्याची घटना घडली आहे. चंदन शहा (वय २५) असे त्या युवकाचे नाव आहे. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने त्याला शोधण्याचे काम सुरू आहे.

मलाड, दिंडोशी येथील क्रांती नगर परिसरात डोंगरावरून येणाऱ्या पाण्यामुळे धबधबा तयार होतो. या धबधब्यावर आसपासच्या परिसरातील लोक पावसाचा आनंद लुटण्यासाठी जात असतात. बुधवारी मुसळधार पावसाने या धबधब्यावर पाण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक लोक या पाण्यात उतरून आंघोळ करत होते. याच दरम्यान सांयकाळी ४.३० च्या दरम्यान क्रांती नगर परिसरातील चंदन शहा पाण्यात उतरला होता. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने त्याला बाहेर येण्यासाठी लोक सांगत होते. मात्र एका दुसऱ्या युवकाने त्याच्या हाताला पकडून दुसऱ्या बाजूला घेऊन जात असताना, चंदनचा तोल गेला आणि तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला.

दिंडोशी अग्निशमन दलाचे वरिष्ठ केंद्र अधिकारी प्रशांत मयेकर यांनी सांगितले की, त्यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर धाव घेतली आणि चंदनचा शोध घेण्यास सुरवात केली. क्रांती नगर पासून पाईसर, महिद्रा गेट, आप्पा पाडा पर्यंत त्याचा शोध घेतला. तीन ते चार पथकाच्या सहाय्याने शोध कार्य सुरू होते. पण पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने त्याचा कोणताही शोध लागलेला नाही.

हेही वाचा : 

Back to top button