NCP Crisis : 'अजित पवार गटाकडून शरद पवारांकडे दिलगिरी व्यक्त' : जयंत पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : “अजित पवार गटातील मंत्र्यांनी झालेल्या घटनेबद्दल शरद पवार यांच्याकडे दिलगीरी व्यक्त केली. याच्यातून काहीतरी मार्ग काढा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. मात्र यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्य़ांनी आज (दि.१६) शरद पवार यांची भेट घेतली. बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. अजित पवार गटाच्या भेटीनंतर शरद पवार गटाच्या नेत्यांची बैठक झाली. यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, अंबादास दानवे यांच्या दालनात विरोधी पक्षांची बैठक सुरू होती. त्यावेळी सुप्रिया सुळे यांचा फोन आला, शरद पवार यांनी तातडीने बोलावले असं त्यांनी सागितलं. सत्ताधारी पक्षासोबत जाऊन शपथ घेतलेले सर्व मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी झालेल्या घटनेबद्दल शरद पवार यांच्याकडे दिलगीरी व्यक्त केली. सगळ्यांना एकत्रीत करावं, अशी विनंती त्यांनी केली आहे. ही अनपेक्षित घटना आहे, यावर भाष्य करणे योग्य नाही. याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा करू, असे पाटील यांनी सांगितले.
“आमच्याकडे १९ ते २० आमदार आहेत. अजित पवार गटासोबत गेलेल्यांपैकीही अनेक आमदार आमच्यासोबत आहेत. अजुनही कागदावर मोठ पक्षबळ आमच्याकडेच आहे. पण आमच्यातील ९ जणांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे. सध्या तर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी काँग्रेसकडे आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :