समीर वानखेडे आर्यन ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणार की नाही? एनसीबीने घेतला निर्णय ! | पुढारी

समीर वानखेडे आर्यन ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणार की नाही? एनसीबीने घेतला निर्णय !

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात चौकशी सुरु असतानाच मुंबई झोनचे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे व्यक्तिगत आयुष्यातील आरोपांमुळे रडारवर आले आहेत. एनसीबी पंच प्रभाकर साईलने केलेल्या सनसनाटी खंडणी आरोपानंतर समीर वानखेडे यांच्याच मागे आता चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

दरम्यान, या चौकशीनंतर समीर वानखेडे यांची बदली होणार की त्यांना या प्रकरणातून बाजूला केले जाणार? याची चर्चा रंगली होती. एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी आजच्या चौकशीनंतर बोलताना माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, समीर वानखेडे यांची आज चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडून क्रुझवरील ड्रग्ज केस प्रकरणातील ज्या कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती त्यांनी ती सादर केली आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांची भविष्यातही चौकशी करण्यात येईल.

संबंधित बातम्या

जोपर्यंत त्यांच्याविरोधात संशयास्पद माहिती सापडत नाही तोपर्यंत क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे चौकशी अधिकारी राहतील, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांच्या फैरीनंतरही समीर वानखेडेच या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सर्व आरोप खोटे असल्याचा वानखेडेंचा दावा

कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी विभागाचा (एनसीबी) पंच प्रभाकर साईल याने केलेल्या आरोपांवरुन करण्यात आलेल्या चौकशीमध्ये समीर वानखेडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

प्रभाकर साईलच्या आरोपांची चौकशी सुरु

प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांची एनसीबीकडून आज चौकशी सुरु करण्यात आल्याचेही ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले. आम्ही दक्षिण पश्चिम विभागाच्या विभागीय कार्यालयाला मुख्य साक्षीदार असलेल्या के. व्ही. गोसावी आणि प्रभाकर साईल यांना नोटीस पाठवण्यास सांगितले आहे, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही, असेही ज्ञानेश्वर सिंह म्हणाले.

एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने केलेल्या आरोपांनुसार एनसीबीच्या पाच सदस्यीय पथकाने एनसीबी मुंबईचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याकडे चौकशी केली.

मुलगा आर्यन याला सोडण्यासाठी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्याकडे 25 कोटींची मागणी करण्यात आल्याचा आरोपासह पंच प्रभाकर साईल याने समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार एनसीबी महासंचालकांनी नेमलेले पाच सदस्यांची समिती पथक मुंबईत दाखल झाले आहे. एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे पथक या आरोपांची चौकशी करत आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button