Mark Zuckerberg सकाळी लवकर का उठत नाहीत? - पुढारी

Mark Zuckerberg सकाळी लवकर का उठत नाहीत?

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

फेसबुकचे (Facebook) संस्थापक मार्क इलियट झुकरबर्ग (Mark Elliot Zuckerberg) हे एक अतिशय यशस्वी सीईओ (CEO) आहेत. यशस्वी व्यक्तीच्या मागे त्याची जीवनशैलीही खूप महत्त्वाची भूमिका बजावते. सोशल मीडिया (social media ) कंपनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांची जीवनशैली अगदी सामान्य आहे.

मार्क झुकरबर्ग यांचा जन्म १४ मे १९८४ रोजी झाला. झुकरबर्ग खूप तरुण आणि यशस्वी आहे. मात्र, इतर टेक कंपन्यांच्या सीईओंप्रमाणे ते सकाळी लवकर उठत नाहीत. झुकरबर्ग यांची सकाळ ८ वाजता उजाडते, म्हणजेच ते सकाळी ८ वाजता उठतात.

कधीकधी अधिकच्या कामामुळे वर्कआउटमध्ये खंड पडतो

झोपेतून उठल्यानंतर ते लगेच त्याच्या फोनवर फेसबुक, फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्सअॅप चेक करतात. याबाबत खुद्द झुकरबर्ग यांनीच माहिती दिली आहे. जेरी सेनफेल्ड यांच्यासोबतच्या फेसबुक लाइव्ह ( Facebook Live )कार्यक्रमात ते बोलत होते. सकाळच्या अपडेटनंतर मी वर्कआउट करतो. पण तो दररोज नित्यनियमाने करतोच असं काही नाही. कधीकधी अधिकच्या कामामुळे वर्कआउटमध्ये खंड पडतो, असंही झुकरबर्ग यांनी म्हटलंय.

‘मी आठवड्यातून तीन वेळा वर्कआउट करतो. अनेक वेळा मी माझ्या पाळीव कुत्र्यासोबत फिरायला जातो. वर्कआउट संपल्यानंतर माझं काम आहे. पोट भरणं, अर्थात मी नाश्ता करतो. तसा मी नाश्त्यातील पदार्थांविषयी काही आग्रही नाही. माझ्या समोर ताटात जे वाढलेले असते ते आवडीने खातो. लहानसहान निर्णयांवर वेळ वाया घालवू नये असं माझं मत आहे. म्हणूनच मी रोज जवळपास सारखेच कपडे परिधान करतो. प्रामुख्याने जीन्स, स्नीकर्स आणि राखाडी टी-शर्ट असा माझा पेहराव असतो. आता ती ‘माझी’ स्टाईल असण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.’

झुकरबर्ग पुढे म्हणतात, २०१४ मध्ये जेव्हा मला माझ्या वॉर्डरोबबद्दल विचारण्यात आले होते. तेव्हा मी प्रेक्षकांना सांगितले एक गोष्ट स्पष्ट केली होती. मला माझे जीवन स्वच्छ ठेवायचे आहे, जेणेकरून किमान निर्णय घ्यावे लागतील. समाजाची सर्वोत्तम सेवा करण्यावर मला माझे लक्ष केंद्रित करायचे आहे.

झुकरबर्ग आठवड्यातून ५० ते ६० तास फेसबुकला देतात. पण, ते सतत्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचाच विचार करतात. सीएनएनला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, जगाशी कसे जोडले जावे आणि समाजाची सेवा कशी करता येईल याचा मी नेहमी विचार करतो.

नवीन काहीतरी शिकण्याचा ध्यास

झुकरबर्ग जेव्हा केव्हा कामात नसतात तेव्हा त्यांना नवीन काहीतरी शिकण्याचा ध्यास असतो. ते सध्या मँडरीन चायनीज शिकत आहेत. झुकरबर्ग वाचनवेडे आहेत. २०१५ मध्ये, त्यांनी स्वतःला दर दोन आठवड्यांत नवीन पुस्तक वाचून पूर्ण करण्याचे आव्हान दिले होते.

झुकेरबर्ग यांचे रोजचे वेळापत्रकही त्याच्या प्रवासावर अवलंबून असते. त्यांचे वारंवार होणारे अमेरिके दौ-यांमुळे ते आगामी काळात राजकारणात जाण्याची शक्यता अनेकांना वाटते. काम किंवा प्रवासानंतरही झुकरबर्ग आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतात. पत्नी आणि मुलीसोबत ते फिरायलाही जातात.

Back to top button