आर्यन खान आणि सहकाऱ्यांची रात्र कोठडीत; उद्या जामीन अर्जावर निर्णय | पुढारी

आर्यन खान आणि सहकाऱ्यांची रात्र कोठडीत; उद्या जामीन अर्जावर निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क

ड्रग्ज प्रकरणातील आर्यन खान, मूनमून धमेचा आणि अरबाज खान यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असून उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजची रात्र या तिघांनाही कोठडीत काढावी लागणार आहे.

ड्रग्ज प्रकरणातील आर्यन खान आणि अन्य आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणीला मुंबई उच्च न्यायालयात सुरुवात झाली असून अमित देसाई बाजू मांडत आहेत.

दरम्यान, आजची सुनावणी पूर्ण झाली असून उद्या या प्रकरणावर निकाल दिला जाणार आहे. एनसीबीने जामिनाला विरोध केला आहे. कामजाजाची वेळ संपल्याने उद्या सुनावणी होऊन निकाल दिला जाणार आहे.

देसाई यांनी एनसीबीने नोंदविलेले जबाब ग्राह्य धरले जाऊ नयेत, असे स्पष्ट करत प्रत्येकजण क्रूझवर स्वतंत्र गेला होता. त्यामुळे हा कटाचा भाग होता असे नाही. एकूण कारवाई पाहता या प्रकरणात तथ्य नाही असेही ते म्हणाले.

या प्रकरणात संशयित असलेल्या दोघांना काल एनडीपीएस कोर्टानेही जामीन मंजूर केला आहे. क्रूझ परत आल्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी एनसीबीने त्यांना सेवनाच्या आरोपाखाली अटक केली होती. रेव्ह पार्टीमध्ये सेवन करताना एनसीबी आरोपींना पकडते आणि नंतर त्यांची त्वरित रक्ताची तपासणी केली जाते. मात्र, या प्रकरणात एनसीबीने ते केलेले नाही.

अरबाज मर्चंट याने जबाबात चरस बाळगल्याचे मान्य केले आणि आर्यनसोबत सेवन करण्यासाठी जात होतो, असेही मान्य केले. पण त्याने तो जबाब फेटाळला आहे. सुप्रीम कोर्टाच्या तुफान सिंह निवाड्याप्रमाणे एनसीबीने घेतलेले जबाब ग्राह्य धरले जात नाही. त्यामुळे ते ग्राह्य धरले नाहीत.

आर्यन आणि त्याच्या मित्रावर अटकेच्या वेळी अमलीपदार्थ बाळगणे आणि सेवन एवढ्याच आरोपाखाली कलमे लावली होती, हे अटक पंचनामा पाहिल्यानंतर स्पष्ट होते. एनसीबीने नंतर त्यांना कोर्टात हजर करून कोठडी मिळविताना कलम २८, २९ ही कट करस्थानाची कलमे लावली, असा देसाई यांनी युक्तिवाद केला.

मूनमून धमेचा हिच्याकडे कुठल्याही प्रकारचे ड्रग्ज सापडले नाही. तरीही तिला कोठडीत ठेवले आहे. ही केस पूर्णपणे बोगस आहे, असे तिच्या वकिलांनी सांगितले.

उद्या दुपारी ३ वाजता सुनावणी होणार असून एनसीबीचे वकील युक्तिवाद करतील. त्यामुळे त्यानंतर जामिनावर निकाल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

Back to top button