कोऱ्या पंचनाम्यावर सही; समीर वानखेडे यांच्याविरोधात आणखी एक पंच समोर | पुढारी

कोऱ्या पंचनाम्यावर सही; समीर वानखेडे यांच्याविरोधात आणखी एक पंच समोर

मुंबई, पुढारी ऑनलाईन

कार्डेलिया क्रूझवर पार्टीवर छापा टाकल्यानंतर आता अडचणीत आलेल्या समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. प्रभाकर साईल यांच्यानंतर आता अन्य एका प्रकरणातील पंच शेखर कांबळे हा समोर आला असून वानखेडेंनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचे सांगितले आहे.

प्रभाकर साईल यांना छापासत्राचा घटनाक्रम, किरण गोसावीचा सहभाग, १८ कोटी रुपयांची डील आणि अन्य बाबींचा गौप्यस्फोट केल्यानंतर एनसीबीला खडबडून जाग आली. पंच म्हणून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा आरोप प्रभाकर साईल याने केल्यानंतर आता अन्य एका प्रकरणातील पंच शेखर कांबळे हा पुढे आला असून खारघर येथे झालेल्या एका प्रकरणात त्याच्या खोट्या सह्या घेतल्याचा आरोप केला आहे.

खारघर येथे एनसीबीने छापा टाकून नायजेरियन नागरिकांवर कारवाई केली होती. या प्रकरणात ज्या दोघांना पकडण्यात आले होते. त्यापैकी कुणाकडेही ड्रग्ज नव्हते. मात्र, त्याच्याकडे ६० ग्रॅम ड्रग्ज सापडल्याचे नमूद केले होते, असा आरोप कांबळे याने केला आहे. या प्रकरणात शेखर कांबळे व त्याच्या एका मित्राला पंच व साक्षीदार बनवण्यात आले होते. मात्र, लिखित पंचनाम्याऐवजी दहा कोऱ्या कागदांवर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. असे का करता अशी विचारणा केली असता ‘आम्ही त्यावर नंतर लिहू’ असे त्यांना सांगण्यात आले.

निनावी पत्रानंतर पंच पुढे

आर्यन खान यांच्यावरील कारवाईनंतर आता एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने निनावी पत्र टाकून २६ संशयास्पद प्रकरणांची यादी दिली होती. या यादीत खारघर येथील प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर हा पंच समोर आला असून त्याने आपली कोऱ्या कागदावर सही घेतल्याचे म्हटले आहे. एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने काल एक निनावी पत्र व्हायरल केल्यानंतर घाबरलेल्या शेखर कांबळे याने मीडियासमोर येण्याचा निर्णय घेतला. समीर वानखेडे आणि त्यांचा ड्रायव्हर अनिल माने हा मला अधूनमधून फोन करायचा. ‘ड्रग्जवाले नायजेरिन कुठे असतील तर सांग,’ असे त्याला सांगून टेवले होते.

चालकाने केला फोन

एनसीबीच्या अधिकाऱ्याने निनावी पत्र व्हायरल झाल्यानंतर शेखर कांबळेला वानखेडे यांचा चालक अनिल मानेचा फोन आला. ‘तू काही बोलू नको’, असे अनिल माने याने सांगितल्याचं कांबळे यांने म्हटले आहे. ‘कारण नसताना आम्ही यात अडकलो आहे. पण चौकशीसाठी बोलावल्यास आम्ही तयार आहोत, सत्य आहे ते सांगू,’ असे कांबळे म्हणाला.

हेही वाचा:

Back to top button