पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होऊन अजित पवार यांनी बंड करीत पक्षात फूट पाडली. अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला समर्थन देणारे पत्र देत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच मंत्रिमडळात सहभागी झाले आहेत. या साऱ्या नाट्यमय घडामोडीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आर. आर. पाटील यांनी भाजपला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अद्यापही बाकी आहे, असे म्हणत आर. आर. आबांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
रोहित पवार यांनी आर.आर.पाटील यांचा ट्विट केलेला व्हिडिओ राष्ट्रवादीच्या एका सभेतील आहे. यामध्ये आर. आर. पाटील म्हणतात की, "भ्रष्ठाचाराचे आरोप असणाऱ्यांना भाजपमध्ये सन्मानानं घेतलं जात, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करता त्यांच्यावर असं कोणतं पवित्र तीर्थ शिंपडले ज्यामुळे ते पवित्र झालेत. भाजप हा साधू संतांचा पक्ष नाही तर संधी साधुंचा पक्ष आहे," अशी टीका त्यांनी त्यावेळी केली होती.
अजित पवार यांच्या बंडात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ आदी आठजणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप आहे. भुजबळ, मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून चौकशी सुरू आहे. माजी नागरी उड्डान मंत्री असलेले प्रफुल्ल पटेल यांची ईडीने संपत्ती जप्त केली होती. यासह राष्ट्रवादीच्या अन्य काही नेत्यांची ईडी चौकशी सुरू आहे. यातच आता अजित पवार यांनी आकस्मिकरीत्या केलेले बंड, या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण लागले आहे.
हेही वाचा :