मोठ्या साहेबांची सहमती समजून मी स्वाक्षरी केली! : आमदार डॉ. किरण लहामटे | पुढारी

मोठ्या साहेबांची सहमती समजून मी स्वाक्षरी केली! : आमदार डॉ. किरण लहामटे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अर्थात मोठ्या साहेबांची सहमती समजून ‘देवगिरी’वर अजित पवार यांच्या पत्रावर मी स्वाक्षरी केली, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केला आहे.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी ‘देवगिरी’ या त्यांच्या शासकीय निवासस्थानी बंद दाराआड झालेल्या घडामोडीची माहिती सांगताना आ. लहामटे म्हणाले, आदल्या दिवशी रात्री 10 वाजता अजित पवार यांचा मला फोन आला होता. त्यांनी मला दुसर्‍या दिवशी भेटायला या, असे सांगितले. मी पहाटे प्रवास करून मुंबईत पोहोचलो असता तेथे मला काही आमदार भेटले. तेथून 9 वाजता आम्ही ‘देवगिरी’ बंगल्यावर गेलो. तेथे आमदार दौलत दरोडा भेटले; मग आम्ही 2-3 जण आतमध्ये बसलो. आत बर्‍याच खुर्च्या दिसल्या. नरहरी झिरवळही भेटले. 11 वाजता बैठकीची वेळ असताना 12 वाजले तरी ती सुरू झाली नाही. 1 वाजता अजित पवार आले. त्यांनी विचारले की, तुमच्या मतदारसंघात किती कामांची आवश्यकता आहे. मी विकासकामांची माहिती घेतली आणि त्यांना दिली. त्यावर ते म्हणाले, हे सर्व करायचे असेल तर आपल्याला सत्तेत जावे लागेल.

‘देवगिरी’त प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे-पाटील आणि इतरही बरेच नेते उपस्थित होते. त्यामुळे मोठ्या साहेबांची सहमती असावी, असे मला वाटले. मी अजित पवारांना म्हणालो की, पक्षाच्या हिताचा निर्णय घ्या. त्यानंतर आम्ही आतमध्ये जाऊन स्टॅम्पपेपरवर सही केली आहे. बाहेर आल्यावर मला खा. सुप्रिया सुळे भेटल्या. खा. अमोल कोल्हेंशी त्या बोलत होत्या. अजित पवार हे आता मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा तेव्हा कानावर आली; पण हे इतक्या लवकर होईल हे माहिती नव्हते, असे डॉ. किरण लहामटे म्हणाले.

या घडामोडींना शरद पवार यांची संमती आहे का, असे मी पदाधिकारी सूरज चव्हाण यांना विचारले. यावर चव्हाण म्हणाले की, बहुतेक संमती असावी; मग थोड्या वेळात सांगण्यात आले की, आपल्याला राजभवनात जायचे आहे. दोन वाजता शपथविधी आहे. राजभवनात पावणेदोन वाजण्याच्या सुमारास पोहोचलो. शपथविधीची प्रक्रिया सुरू झाली. आमच्याबरोबर धर्मराव आत्राम हे होते. तेही शपथ घेणार आहेत, हे आम्हाला माहीत नव्हते.

शपथविधी झाल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा आम्हाला समजले की, शरद पवारांचे याला समर्थन नाही.
मी अमोल कोल्हेंना म्हटले की, आता तर धर्मसंकट उभे राहिले आहे. राजकारण कुणासाठी करायचे, तर जनतेसाठी; मग मी निर्णय घेतला. थोड्या वेळात मी अजित पवारांना हात जोडले. त्यांना म्हटले, मी चाललो मतदारसंघात. यावर ते म्हणाले, आता जा तुम्ही; मग मी निघून आलो.

मतदारसंघाकडे निघत असताना संध्याकाळी 6 वाजता शरद पवारांचा फोन आला की, 5 तारखेच्या बैठकीला या. त्यांनाही मी मतदारसंघात चालल्याचे सांगितले. तेथे गेल्यावर जनता जो निर्णय देईल, तो मी घेईन, असे असे लहामटे म्हणाले.

परवानगीशिवाय माझा फोटो वापरू नका; शरद पवारांची तंबी

अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स झळकत आहेत. या बॅनर्सवर शरद पवारांचेही फोटो आहेत. यामुळे संतापलेल्या शरद पवारांनी अजित पवारांच्या गटाला परवानगीशिवाय फोटो वापरण्यास मनाई केली आहे. माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरण्यात यावा. मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, त्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. याउलट ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला, ज्यांच्याशी माझे आता वैचारिक मतभेद आहेत त्यांनी यापुढे माझ्या परवानगीनेच माझा फोटा वापरावा. अन्य कुणीही माझ्या परवानगीशिवाय फोटो वापरू नये, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button