Maharashtra Politics : अजित पवारांची एंट्री होताच शिंदे गटाला घरट्याची आठवण | पुढारी

Maharashtra Politics : अजित पवारांची एंट्री होताच शिंदे गटाला घरट्याची आठवण

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची सरकारमध्ये एन्ट्री होऊन 24 तास उलटत नाहीत तोच शिंदे गटाच्या आमदारांना आपल्या घरट्याची म्हणजेच मुळ शिवसेनेची आठवण झाली आहे.

आम्हाला उद्धव ठाकरेंकडून साद घातली गेली तर आम्ही त्यांना प्रतिसाद देऊ असे ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी सांगितले. देसाई म्हणाले, हा जर तरचा विषय आहे. त्यांनी आम्हाला बोलावले, एकत्र येण्यास साद घातली तर आम्ही त्याचा नक्की विचार करू. आम्ही उठाव केला तेव्हा देखील मी उद्धव ठाकरे यांना आवाहन केले होते की झाले गेले विसरून जा. आपण शिवसेना – भाजपाचे सरकार सत्तेवर आणू. पण उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नाही. आता त्यांनी काही आम्हाला साद घातलेली नाही. पण कधी घातली तर आम्ही त्यावर विचार करू. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाची इच्छा असल्यास त्यांनाही सरकारमध्ये घेऊ असे विधान केले.

अजित पवारांना घेतलेच का?

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या 40 आमदारांपैकी 20 आमदारांमध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता आहे. मुळात आम्हाला बहुमताची गरज नव्हती; मग अजित पवार यांना का घेतले, असा सवाल औरंगाबादचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. आमच्याकडे 172 आमदार असताना पुन्हा त्यांना (अजित पवार) घ्यायची गरज काय? मात्र राजकारणात काही समीकरणे बसवावी लागतात. हे सगळे सुनियोजित असल्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत, असेही ते म्हणाले.

आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रिपद दिल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला आहे. आम्हाला अर्धी भाकर मिळणार होती ती आता पाव मिळणार अशी प्रतिक्रिया नोंदवत शिंदे गटाचे प्रतोद भारत गोगावले यांनी आपली अस्वस्थता व्यक्त केली.

एकंदरीत अजित पवार यांच्या सरकारमधील एन्ट्रीने शिंदे गटाची कोंडी झाल्याचे चित्र आहे. या स्थितीमध्ये आता शिंदे गटाच्या आमदारांना आपल्या मूळ घरट्याची, ठाकरेंच्या आठवण येऊ लागली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना नारायण राणे, राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा स्वतः शिवसेनाप्रमुखांनी ‘या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या’ अशी साद घेतली होती. त्याची आठवण करून देत शिंदे गटाच्या ठाणे जिल्ह्यातील काही आमदारांनी मातोश्रीने साद घेतली तर आम्ही प्रतिसाद देऊ असे विधान केले आहे. कोकणातून एकनाथ शिंदे यांच्यासोबत बारा आमदार गेले आहेत. राज्यातून गेलेल्या आमदारांची संख्या चाळीस आहे. या सर्व आमदारांमध्ये नव्या राजकीय घडामोडींमुळे अस्वथता आहे. ठाकरे गटालाही सत्तेत सहभागी करून घ्या, अशी मागणी शिंदे गटाच्या काही आमदारांनी भाजपाकडे केली आहे तर शिवसेना पुन्हा एकत्र यावी यासाठी काही जणांचे प्रयत्न सुरु आहेत.

Back to top button